मैत्र…

‘जीवन’ सुरू होऊन संपेस्तोवर कोणाची ना कोणाची तरी साथ मागत असते. “मॅन इज ए सोशल ऍनिमल’ हे सोशिओलॉजी या विषयाचे पहिले वाक्‍य आहे. आपण आई-वडलांपासून सुटे झालो की, मित्र जमवतो. शाळेत आपले खूप मित्र होतात. त्यातला- हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, असे आपण आईला सांगतो. शाळेत त्याच्या शेजारी बसून एकत्र डबा खातो, एकत्र अभ्यास करतो. कधी तरी भांडतो देखील आणि भांडण झाले की घरी रडकं तोंड घेऊन येतो. मग आपल्या दोघांच्याही आया शाळेत येऊन आपला समझोता करतात. कट्टीची बट्टी होते.

आपल्या आया नोकरी करत नव्हत्या. डबा भरताना आपल्या मित्राकरताही त्याची आवडती भाजी जास्त भरली जायची. कोणाचीही आई आजारी पडली तर दुसऱ्याला डबा जायचा. हे शाळेतले मैत्र खूप सुंदर आणि निरपेक्ष असते. बहुतेकदा शाळा संपली की, हे मैत्र संपते आणि मग राहतात आठवणी; पण हे मैत्र सहजपणे अखंड चालू राहिले तर…! तशा चालू राहिलेल्या मैत्राची कहाणी आज सांगतो आहे. पोहण्यच्या तलावावर नियमितपणे येणारे राजाभाऊ आणि बुवा. बुवांचे किशोर नाव प्रचलित नाही. दोघेही एकाच वयाचे, राजा धनराजगिरजी शाळेत दप्तर आणि घसरणारी पॅंट सावरत, गळ्यात हात टाकून दोघेही गेले.

-Ads-

दोघांची घरेही रास्ता पेठ, सोमवार पेठेतच. एक सुंदर बाल्य दोघांनी अनुभवले. त्यानंतर दोघांनी एम. ई. एस. कॉलेजलाच प्रवेश घेतला, तोही एकाच शाखेत. दोघांची शाळेतली दोस्ती कॉलेजात बहरली. दोघांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपली दोस्ती कधीच जगजाहीर केली नाही. सगळ्यांच्यात मिसळले. त्या दोघांनी आपल्या दोघांचाच “ग्रुप’ तयार केला नाही. शाळेपासूनचे दोस्त आहोत, हे त्यांना कोणालाही सांगायची जरूर वाटली नाही आणि हेच महत्त्वाचे होते. कॉलेजमध्ये आपल्या घरच्या परिस्थितीची रास्त जाण दोघांनाही होती. त्यांनी आपल्या गरजा अतिशय कमी ठेवल्या. आनंदात दिवस काढले. दोघांना एकमेकांचा सुंदर असा आधार होता.

‘मी किशोरच्या घरी बऱ्याचदा असायचो आणि मला ते माझेच घर वाटायचे’, या राजाभाऊंच्या एक वाक्‍यात खूप काही समजते. बुवांनीही हा मित्र माझ्याच घरी असायचा हे सांगितले नाही कारण त्यांच्या लेखी त्यांचे घर राजाचेही होते… अजूनही आहे. हा “दोस्ताना’ आपण सिनेमात पाहतो, गोष्टीत वाचतो; पण राजाभाऊ आणि बुवा हा दोस्ताना शब्दश: जगले आणि अजूनही जगताहेत. नियती प्रसन्न असली की असेही जीवन भरभरून देते.

कॉलेज जीवन संपले. या दोघांच्या बाबतीत त्यांच्या जीवनातील ही सुंदरता कळते, पण नेमकेपणे मांडता येत नाही. कारण या दोघांनीही त्यांचे सहजीवनाचे क्षण आजच्या भाषेत “व्हायरल’ केले नाहीत. अजूनही करत नाहीत आणि म्हणूनच दोघेही एक उत्तम भावनिक आयुष्य जगताहेत.

मैत्रीचा चौथा टप्पा दोघात सुरू आहे. शालेय जीवनातील मैत्री, कॉलेजची मैत्री, संसारात पडल्यानंतरची मैत्री आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतरची मैत्री. संसारात पडल्यानंतरही त्यांच्या मैत्रीत ते सतत भेटले नाहीत, तरी त्यांच्यात दुरावा आला नाही. राजाभाऊंनी बहुतेक वर्षे पुण्याच्या आजूबाजूस शंभर कि.मी.वरील गावातच काढली. बुवा पिंपरी-चिंचवडच्या कंपनीत नोकरीला लागले. त्यामुळे त्यांच्यातली आत्मीयता आणि एकमेकांबद्दलच्या ममत्वाला ओहोटी लागली नाही.

शाहू जलतरण तलावावर दोघेही नियमितपणे पोहायला येतात, तसेच अनेकजणही येतात. एकमेकांत गप्पा गोष्टीही होतात. त्यात हे दोघेही सहभागी असतात. तिथेही कधी शाळेपासूनच्या दोस्तीचा त्यांनी कधीही डांगोरा पिटला नाही. आपण ज्या कंपूत रहातो, त्यात एकमेकांशी सद्‌भावना ठेवून राहतो. गप्पा मारतो. माफक चेष्टामस्करी चालते. त्यात परिचय असतो; पण ममत्व नसते. ममत्व हे नेहमी डोळ्यातून किंवा तुमच्या हाक मारण्याच्या पध्दतीतून व्यक्‍त होते. बुवा आणि राजाभाऊंमध्ये टॅंकवर फारसा संवाद नसतो. एकदा बुवांनी ‘अरे राजा!’ अशी हाक राजाभाऊंना मारली. त्यावेळेला बुवांचा आवाज नेहमीपेक्षा खूप वेगळा म्हणजे ममत्वपूर्ण होता. त्या हाकेत वात्सल्य होते.

दोस्ताविषयी अपार प्रेम होते. त्यांच्या ‘अरे राजा’ या दोन शब्दांत गोडवा भरला होता. राजाभाऊंचा प्रतिसादही तितकाच सुंदर होता. हा आवाजातला फरक आणि गोडवा मला जाणवला. यांची मैत्री “विशेष’ आहे, हे मी जाणले आणि त्यांची ही निखळ मैत्री मी शोधू लागलो. राजाभाऊ-बुवा हे “दारू’दोस्त नाहीत. भागीदारीच्या धंद्यात प्रचंड पैसा मिळत असल्याने झालेली ही दोस्ती नाही. एकमेकांचे स्वार्थ संभाळले जातात म्हणूनची देखील ही दोस्ती नाही. दोन आत्म्यांची जीवा-शिवाची ही दोस्ती आहे.

दोघांनीही आयुष्याची बरीच मोठी वाटचाल पुरी केली आहे. त्या वाटचालीत त्यांनी एकमेकांच्या अडचणी एकमेकांना सांगितल्या असतील किंवा त्या न सांगताही एकमेकांना कळल्या असतील. “वपुं’चे एक सुंदर वाक्‍य आहे- “स्पर्श न करताही आधार देता येतो.’ असा आधार इथे नक्‍की दिला गेला आहे आणि दिला जातो आहे. आनंदाचे क्षणही त्यांनी वाटले असणार आहेत. राजाभाऊ आणि बुवा यांची मैत्री संयमी आहे. सुखाच्या क्षणात आणि अडचणीच्या वेळातही! दोघांनीही ती मैत्री सहजपणे जपली आहे, जपताहेत.

हा लेख प्रसिध्द झाल्यावर बुवा राजाला म्हणतील- ‘अरे राजा, आपल्यावर लेख आलाय म्हणे.’ कलंदर राजाभाऊ म्हणतील “अरे छोड दे यार, भूतकाळातल्या गोष्टींवरचा लेख! चल, आपण आजचा आपल्या मैत्रीचा नवा दिवस सुंदर करूया.’ नियतीलाही त्यांचा हेवा वाटतो.

श्रीकृष्ण केळकर 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)