मैत्रीपर्वाला उजाळा (अग्रलेख )

गेल्या काही दिवसांत भारत व रशियात सात करार झाले आहेत. रशियाने तयार केलेल्या संरक्षण साहित्यातील सुट्या भागाची निर्मिती भारतात होणार आहे. रशियाकडून पाच एस चारशे ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली, प्रोजेक्‍ट 1135.6 लढाऊ जहाज, के ए 226 टी हेलिकॅप्टर खरेदी करण्याची योजना आहे; परंतु कॅटसा या निर्बंध कायद्यामुळे भारतावर काय परिणाम होईल, याचा विचार मोदी व पुतीन यांच्या बैठकीत झाला असण्याची शक्‍यता आहे.

भारत व रशियाचे मैत्रीसंबंध आजचे नाहीत. कितीही सत्तांतरे झाली, तरी हे मैत्रीसंबंध कायम राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची यापूर्वी अनेकदा भेट झाली; परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या भेटीला थोडे वेगळे महत्त्व होते. मागच्या आठवड्यात मोदी जसे चीनला जाऊन आले; कोणताही अजेंडा नसताना त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यांशी चर्चा केली, तशीच आता अनौपचारिक चर्चा पुतीन यांच्यासोबतही केली. तिथेही कोणताही अजेंडा नव्हता. रशियाशी आर्थिक संबंध वाढविण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्या देशावरही बहिष्कार घालण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला असताना, मोदी यांनी रशियाला भेट देण्यातून अमेरिकेलाही इशारा देण्याचा हेतू साध्य झाला.

कोणत्याही देशाने इतर दोन देशांतील परराष्ट्ररसंबधात हस्तक्षेप करू नये, हा साधा नियम ट्रम्प पाळायला तयार नसतील, तर त्यांच्या इशाऱ्याची तरी पर्वा कशाला करायची’, असाच संदेश मोदी यांनी या दौऱ्यातून दिला आहे. पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतरचा मोदी यांचा पहिलाच दौरा होता. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध घालण्याचा इशारा दिल्यानंतर भारताला इंधनासाठी पर्याय शोधावे लागतील. त्यात रशिया हा ही एक पर्याय असू शकतो. चीन आणि पाकिस्तान शस्त्रास्त्रांनी समृद्ध होत असताना त्याच तोडीची शस्त्रास्त्रे भारताला हवी आहेत. तो शोध रशियातच संपतो. दोन्ही देशातील संरक्षण मंत्रालयांत चांगले संबंध आणि विश्‍वासार्हताही आहे. भारत आणि रशियाचे संबंध आता विशेष व्यूहात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचले आहेत.

दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक चर्चा केली. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्‍वासाचा वापर करून जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्दयांवर एकमत तयार करणे हा या भेटीचा उद्देश होता. भारत व रशियातील व्यापार वाढतो आहे. त्याचा उल्लेख पुतीन यांनी मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत केला. चालू वर्षात दोन्ही देशांत 40 टक्‍के व्यापारवृद्धी झाली. अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध आणि इराणबरोबरील अणुकरारातून अंग काढून घेणे याच्या परिणामांबबात या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्‍यता आहे. दोन नेत्यांतील चर्चेचा सर्वंच तपशील कधीही दिला जात नसतो. परराष्ट्र व्यवहारात बऱ्याचदा कमी बोलायचे असते आणि कृती जादा करायची असते. इराण हा भारताचा तिसरा मोठा खनिज तेल पुरवठादार देश आहे. त्यासह इराणमधील चाबहार बंदरात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे.

या दोन्ही गोष्टींवर अमेरिकेच्या धोरणाचा परिणाम होऊ शकतो. त्याला सामोरे जाण्यासाठीची भूमिका ठरवली असण्याची शक्‍यता आहे. या चर्चेत आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय अशा दोन्ही मुद्द्यांचा समावेश होता. इराणच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. संरक्षण साधनांचा पुरवठा, अणुऊर्जा, व्यापार, आयात निर्यात अशा अनेक बाबींवर धोरणात्मक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या पोलिसी दादागिरीला आणि व्यूहात्मक रचनेत रशियाच महत्त्वाची भूमिका बजावतो. शीतयुद्धोतर काळात आणि सध्याच्या मध्य पूर्वेतील राजकारणातही रशियाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

एका बाजूला मोदी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर मिळून चीनचा सामना करण्यासाठी भागीदारी वाढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चीन, रशिया आणि पाकिस्तानचा समावेश असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन बरोबर पुढे जाऊ इच्छित आहेत. त्यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणाबाबत साशंकता घेणारे अनेक आहेत. असे असले, तरी ट्रम्प यांच्यासारख्या बेभरवशाच्या नेत्यापेक्षा पुतीन यांच्यासारखा नेता परवडला, असे मोदी यांना वाटले तर त्यात काही वावगे नाही. उत्तर कोरिया, इराण आणि रशियावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. अमेरिकेच्या या बंदीमुळे रशिया आणि भारताच्या संरक्षण करारावर काही फरक पडेल का, हे अजमावण्यासाठीही ही भेट महत्त्वाची होती. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते भारत आपल्या गरजेच्या एकूण 68 टक्के शस्त्रास्त्रे रशियाकडून खरेदी करतो.

अमेरिकेकडून 14 टक्के तर इस्रायलमधून 8 टक्के शस्त्रास्त्र भारत खरेदी करतो. आताही भारताला 12 अब्ज डॉलर किमतीची शस्त्रास्त्र देण्याची तयारी रशियाने दाखविली आहे. गेल्या काही दिवसांत भारत व रशियात सात करार झाले आहेत. रशियाने तयार केलेल्या संरक्षण साहित्यातील सुट्या भागाची निर्मिती भारतात होणार आहे. रशियाकडून पाच एस चारशे ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली, प्रोजेक्‍ट 1135.6 लढाऊ जहाज, के ए 226 टी हेलिकॅप्टर खरेदी करण्याची योजना आहे; परंतु कॅटसा या निर्बंध कायद्यामुळे भारतावर काय परिणाम होईल, याचा विचार मोदी व पुतीन यांच्या बैठकीत झाला असण्याची शक्‍यता आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांचे संबंध चांगले झाले, तर पाकिस्तान अमेरिकेपासून दूर झाला.

दुसऱ्या बाजूला रशिया आणि पाकिस्तानचे संबंध सुरुवातीला कधी चांगले नव्हते, पण आता सुरक्षा करार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. रशिया आणि भारताचे संबंध सध्या जटील अवस्थेत आहे. भारत अमेरिकेला सोडू शकत नाही आणि रशियालासुद्धा. दोन्ही देशांशी असलेल्या संबंधात संतुलन ठेवणे यातच भारताचे हित आहे आणि मोदी यांनी या ताज्या दौऱ्यात त्यावरच भर दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)