प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25  – गोरगरीब, गरजू यासह महिलांचे आणि अल्पभुधारकांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहे. नवनविन योजना राबविण्यात पुणे जिल्हा नेहमीच अग्रेसर ठरला आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “मैत्रिणी योजना’ लाभार्थ्यांना फायद्याची ठरत आहे. मैत्रीण योजनेअंतर्गत 418 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 शेळ्यांचे वाटप करण्यात आले होते. तर, 740 लाभार्थ्यांना कडकनाथ कोंबडीची एक महिन्यांची पिल्ले देण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती देताना शिरूर तालुक्‍यातील मांडवगण राटा येथील लाभार्थी वंदना चकोर म्हणाल्या की, 2016-17 मध्ये मला 5 शेळ्यांचा गट लाभाच्या स्वरूपात मिळाला होता. आता सद्यस्थितीत माझ्याकडे लहान मोठ्या मिळून 17 शेळ्या आहेत. या योजनेमुळे मला उत्पन्नाचे साधन मिळाले असून आर्थिक फायदा झाला आहे. तसेच गेल्यावर्षी 740 कडकनाथ कोंबड्यांची पिल्लांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कडकनाथ कोंबडी ही देखील गोरगरीबांना उत्पन्नाचे हक्काचे साधन मिळाले आहे. याबाबत लाभार्थी प्रभाकर ढमढेरे म्हणाले की, सन 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडीची एक महिन्याची 50 पिल्ले देण्यात आली होती. त्यातील 45 पक्षी जिवंत राहिले. त्यातून 25 हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)