मेहबुबा मंत्रिमंडळात बुखारी यांचे कमबॅक

जम्मू  – जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा दहा महिन्यांनी आज पहिला विस्तार करण्यात आला. त्यानुसार पीडीपीचे आमदार सैद अल्ताफ बुखारी यांचे मंत्री म्हणून कमबॅक झाले.
येथील राजभवनात झालेल्या साध्या सोहळ्यात राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी बुखारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मेहबुबा यांचे दिवंगत वडील आणि माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात बुखारी यांचा समावेश होता. मात्र, मागील वर्षी एप्रिलमध्ये मेहबुबा यांनी सुत्रे स्वीकारल्यावर बुखारी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नव्हते. आता त्यांच्या समावेशामुळे राज्य मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या 24 इतकी झाली आहे. जम्मू-काश्‍मीर विधानसभेचे एकूण संख्याबळ 70 इतके आहे. त्या राज्यात जास्तीत जास्त 25 मंत्री नेमले जाऊ शकतात. जम्मू-काश्‍मीरात पीडीपी-भाजप युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांसह पीडीपीचे 13 तर उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे 11 मंत्री आहेत. पीडीपीच्या वाट्याचे एक मंत्रिपद पहिल्या विस्तारानंतरही रिक्त राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)