मेहतांना वाचविण्यासाठी देसाईंना पाठीशी घातले

धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

मुंबई  – गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा न स्विकारता त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्र्यांना कितीही वाचविण्याचा प्रयत्न केला तरी आमचा भ्रष्टाचारी मंत्री आणि सरकार विरोधातील लढा सुरूच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही त्यांना पदावर कायम ठेऊन चौकशी करणे कोणत्या नैतिकतेमध्ये बसते, असा सवाल करतानाच या मंत्र्यांची ते पदावर असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

या मंत्र्यांच्या चौकशीत कागदपत्रे उपलब्ध करून देणे, साक्षी नोंदवणे ती कार्यवाही विभागाचे अधिकारी करणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदलीचे त्यांच्या चौकशीचे अधिकार, गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार त्या विभागाच्या मंत्र्यांना असतात. त्यामुळे हे मंत्री पदावर असताना त्यांच्या विभागातील अधिकारी, त्यांच्या विरूध्द साक्ष कशी देऊ शकतील, कागदपत्रे कशी पुरवतील, असे एकापेक्षा एक सवाल करीत ही चौकशी निव्वळ फार्स ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हा प्रश्न निव्वळ नैतिकतेचा नाही तर दबाव विरहीत चौकशीसाठी मंत्र्यांना पदावरून दुर करणे आवश्‍यक आहे. जे मंत्री मुख्यमंत्र्यांवर कारवाई टाळण्यासाठी इतका दबाव आणु शकतात ते अधिकाऱ्यांना कदापिही निष्पक्ष चौकशी करू देणार नाहीत. त्यामुळे मंत्र्यांच्या राजीनामा घेवुनच त्याची चौकशी करावी.
– धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)