मेस्सीलाच फॉलो करणार, पण फेव्हरिट कुणीच नाही – सुनील छेत्री 

नवी दिल्ली – विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा आता तोंडावर आली असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही चांगलाच बहरात आला आहे. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील एकूण गोलची बरोबरी करण्याची कामगिरी त्याने केली असून, आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण मेस्सीलाच फॉलो करणार असलो, तरी विजेतेपदासाठी कोणताहीच संघ आपला फेव्हरिट नसल्याचे त्याने सांगितले.

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर एका खासगी कार्यक्रमात बोलताना छेत्रीने मोकळेपणाने आपली मते मांडली. तो म्हणाला की, आता महिनाभर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा आनंद आपण घेणार आहोत. स्पर्धेबाबत मी कमालीचा उत्सुक आहे. कुठलाच संघ माझा फेव्हरिट नाही. मी सर्व सामने पाहणार तर आहेच. खेळाडू म्हणून म्हणाल, तर अर्थातच मी मेस्सीला “फॉलो’ करणार आहे.

चार देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्यपूर्ण गोल करून छेत्रीने मेस्सीच्या 64 आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली आहे. छेत्री म्हणाला, माझ्यासाठी ही मोठी कमाई असली, तरी मला अजून मोठी मजल मारायची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी खूप वर्षे खेळायचे आहे. भारतामध्ये फुटबॉलसाठी गुणवत्ता भरपूर आहे. पण ती समोर यायला हवी. सध्याचा संघही चांगला आहे. या संघाला किमान आशियातील सर्वोत्तम संघांबरोबर खेळण्याची अधिक संधी मिळाली, तर भारतीय फुटबॉलसाठी ते फायद्याचे असेल, असेही छेत्रीने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)