मेरूदंडाच्या सुदृढतेसाठी करा वक्रासन

वक्रासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. वक्र म्हणजे वाकडा. यामध्ये पाठीचा कणा आणि हात-पाय यांना म्हणजेच शरीराच्या वरच्या भागाला वक्रता दिली जाते. हे आसन करताना प्रथम बैठक स्थिती घ्यावी, दोन्ही पाय लांब करावेत, मग डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवावा आणि डाव्या हाताचा पंजा जमिनीवर ठेवावा. डाव्या पायाचा गुडघा उजव्या हाताच्या बगलेत आणि मगच उजव्या हाताचा पंजा जमिनीवर टेकवावा. कंबर ताठ ठेवून शक्‍य तितके मागे मान करून वळून पहावे. हे आसन उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूने करता येते. आसन सोडताना मान आणि दृष्टी समोर आणावी, उजवा हात जागेवर न्यावा, डाव्या हाताचा पंजा सरळ करावा, डावा पाय सरळ करून बैठक स्थितीत न्यावा.
उजवा हात हा डाव्या गुडघ्याच्या पलीकडून डाव्या हाताची स्थिती व बदलता त्याच्यासमोर टेकवला जातो. त्यामुळे दोन्ही हातांची बोटे विरुद्ध दिशेला येतात. दोन्ही मनगटे मात्र एकमेकांसमोर येतात. दोन्ही हातांमध्ये साधारण फूटभर अंत रहाते. उजव्या हाताच्या दंडाच्या आधाराने डाव्या पायाला गुडघ्याजवळ मागे रेटावे लागते आणि मग मात्र डावीकडे वळवावी. याप्रमाणे डाव्या आणि उजव्या बाजूने हे आसन करतात. सुरुवातीला चार ते सहा वेळा रोज हे आसन करावे. या आसनाचा फायदा मिळविण्याकरिता कालावधी दोन मिनिटे टिकविता आला पाहिजे. पण हे सरावाने व योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनखाली जमू शकते. पायाला मागे रेटून पाठीच्या कण्यातील ताण वाढविण्याची क्षमता वक्रासनात असते. आपल्याला झेपेल एवढेच हे आसन करावे. नियमित अभ्यास केला तर सहा मिनिटेसुद्धा हे आसन टिकविता येते. ताणाची सवय हळूहळू वाढवावी. या आसनात केवळ पाठीच्या कण्याला ताण बसतो असे नाही तर पोटालाही ताण बसतो. त्यामुळे पोटातील इंद्रियांवरही दाब यतो. पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या मज्जारज्जूवर म्हणजेच मेरूदंडावर चांगलाच दाब येतो. त्यामुळे मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढते, ज्ञानतंतू कार्यक्षम होतात, सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाते. त्यामुळे कुंडलीनी शक्‍ती उर्ध्वगामी बनते. या आसानमुळे कंबरेचे स्नायू तर कार्यक्षम होतातच पण पाठीच्या कण्याची लवचिकताही वाढते.
वक्रासन करताना सावधगिरी बाळगावी, अकारण ताण देऊ नये, झेपेल तेवढेच आसन करावे, पाठीच्या कण्याचा विकार असणाऱ्यांनीच हे आसन तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावे. वक्रासन अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. योग्य सरावाने केले तर सुदृढ मेरूदंड आणि कार्यक्षम ज्ञानतंतूचा लाभ तर आपल्याला मिळतोच पण आपले जीवनच संपन्न आणि सुखी होते. गुडघ्याचे सहाय्य घेतल्याशिवाय म्हणजेच रेटा दिल्याशिवाय आसनस्थिती आदर्श येत नाही. गुडघ्याजवळ मागे रेटून खांद्याचा आधार घेतल्यामुळेच मान डावीकडे अथवा उजवीकडे दोन्ही बाजूने करताना वळवणे शक्‍य होते. आसनस्थितीत संथ श्‍वसन चालू ठेवावे. स्त्रियांनी गरोदरपणात व मासिकधर्मात हे आसन करू नये. ज्यांची पोटाची, पाठीची ऑपरेशन्स झाली आहेत त्यांनी डॉक्‍टरी सल्ल्यानंतरच हे आसन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)