मेरी कोम राष्ट्रकुल मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला

गोल्ड कोस्ट- भारताची माजी जगज्जेती मेरी कोम हिने महिलांच्या 48 किलो गटांत विजेतेपद पटकावताना भारताला राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील महिलांच्या मुष्टियुद्धात पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तसेच गौरव सोळंकीने पुरुषांच्या 52 किलो गटांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या दोघांनीही राष्ट्रकुल पदार्पणातच हे यश मिळविले आहे. सायंकाळच्या सत्रात विकास कृष्णनने पुरुषांच्या 75 किलो गटांत भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले.

याआधी पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणारी आणि ऑलिम्पिक कांस्यविजेती मेरी कोम हीच आजच्या दिवसाची स्टार ठरली. सुवर्णपदकाच्या लढतीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओ’हाराचे कडवे आव्हान 5-0 अशा गुणफरकाने मोडून काढताना मेरी कोमने हे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. नर्सिंग होममध्ये नोकरी करणाऱ्या ओ’हाराला मेरी कोमच्या आक्रमणासमोर नीटसा बचावही करता आला नाही. दुसऱ्या फेरीत तर मेरीने तिच्यावर ठोशांचा वर्षावच केला.

पुरुषांच्या 52 किलो गटांतील अंतिम फेरीत गौरव सोळंकीने उत्तर आयर्लंडच्या ब्रेन्डन आयर्विनला 4-1 अशा फरकाने पराभूत केले. हे सुवर्णपदक आपल्या आईला अर्पण करतानाच टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हेच आपले खरे लक्ष्य असल्याचे गौरवने सांगितले. पुरुषांच्या 75 किलो गटाच्या अंतिम लढतीत विकास कृष्णनने कॅमेरूनच्या डियुडॉन विल्फ्रेड नितसेंग्युचा एकतर्फी पराभव केला.

भारताच्या अमित पांघाल (49 किलो) आणि मनीष कौशिक (60 किलो) यांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमित पांघालला 49 किलो गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या युरोपियन रौप्यविजेत्या गलाल यफाईविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तर 60 किलो गटाच्या अंतिम लढतीत मनीष कौशिकने मात्र ऑस्ट्रेलियाच्या हॅरी गारसाईडला कडवी झुंज दिल्यानंतरच 2-3 असा पराभव स्वीकारला.

याआधी भारताच्या नमन तन्वरने 91 किलो वजनी गटात, मनोज कुमारने 69 किलो वजनी गटात व मोहम्मद हुसामुद्दीनने 56 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविताना मुष्टियुद्ध प्रकारात भारताचे खाते उघडले. विकास कृष्णन, सतीश कुमार, अमित पंघाल, गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी अनुक्रमे 75 किलो, 91 किलो, 49 किलो, 52 किलो आणि 60 किलो वजनी गटाच्या लढतींच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना आपले पदक निश्‍चित केले आहे.

सायप्रसची घसरगुंडी, वेल्सची प्रगती

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आता 25 सुवर्णपदकांसह, 16 रौप्य व 18 कांस्य अशा एकूण 59 पदकांची कमाई केली असून पदकतालिकेतील तिसरा क्रमांक कायम राखला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया 74 सुवर्णांसह एकूण 186 पदके पटकावून अग्रस्थानी असून इंग्लंड 42 सुवर्णासह 123 पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाने 15 सुवर्णांसह 80 पदके जिंकून चौथा क्रमांक राखला असून दक्षिण आफ्रिका (13 सुवर्णांसह 37 पदके) आणि न्यूझीलंड (12 सुवर्णांसह 41 पदके) यांनी पदकतालिकेत अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकाची निश्‍चिती केली आहे. सातव्या स्थानावरील स्कॉटलंडनंतर (9 सुवर्णांसह 43 पदके) वेल्सला (9 सुवर्णांसह 35 पदके) सायप्रसला मागे टाकून आठव्या स्थानावर प्रगती केली आहे. नायजेरियाने (9 सुवर्णांसह 23 पदके) नववे स्थान राखले असून सायप्रसची (8 सुवर्णांसह 14 पदके) दहाव्या क्रमांकावर घसरगुंडी झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)