#मेन स्टोरी: नव्या वळणावर… (भाग १)

विनायक सरदेसाई
दक्षिणेकडील राज्यांमध्ये व्यक्‍तिपूजेचे स्तोम किती मोठे आहे हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. तेथील राजकीय पटलावर पक्ष, पक्षविचारसरणीपेक्षाही पक्षनेतृत्वपदी असणाऱ्या व्यक्‍तीचा करिष्माच अधिक असतो. साहजिकच हे नेतृत्व हरपले की पक्ष कमकुवत होतो आणि पक्षाचा जनाधारही सैरभैर होऊन घटत जातो. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच पक्षांतील राजकारणाभोवती वर्षानुवर्षे फिरत राहणाऱ्या तमिळनाडू या राज्यात आज अशीच स्थिती आहे. जयललिता आणि करुणानिधी यांचे जाणे आणि त्याच दरम्यान दोन बड्या कलाकारांनी पक्ष काढणे, भाजपानेही या राज्याकडे आपला मोर्चा वळवणे या सर्वांतून तमिळनाडूचे राजकारण नव्या वळणावर जाणार आहे. 
द्रमुक नेते सी. एन. अण्णादुरई यांचे 1969 मध्ये जेव्हा निधन झाले, तेव्हा त्यांची जागा भरून काढणारे नेतृत्व करुणानिधींच्या रूपाने पक्षाला तातडीने मिळाले होते. त्यावेळी करुणानिधी एक पटकथा लेखक होते आणि अण्णा द्रमुकची पायाभरणी करणारे एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांना अभिनेता ते राजकीय नेता या प्रवासात मोठी मदत केली होती. दुसरीकडे, एमजीआर यांचे 1987 मध्ये निधन झाल्यानंतर करुणानिधी यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी जयललिता यांनी त्यांची जागा भरून काढून अण्णा द्रमुक यांची धुराच केवळ सांभाळली नाही तर 1991, 2001, 2011 आणि 2016 च्या निवडणुकांमध्ये पक्षाला दमदार विजयही मिळवून दिला आणि आपले नेतृत्व सिद्ध केले.
परंतु गेल्या वर्षी जयललितांचे निधन आणि त्यानंतर करुणानिधींची निवृत्ती यामुळे तमिळनाडूतील राजकारण आणि दोन्ही प्रमुख पक्ष कमकुवत होऊ लागले. जानेवारी 2017 मध्ये द्रमुकच्या कार्यकारी अध्यक्षपदी एम. के. स्टॅलिन यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्वपद मिळण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त झाला. परंतु करुणानिधींची प्रतिमा आणि कार्यपद्धती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी खोलवर रुजलेली आहे की, त्याआधारेच आपली कार्यपद्धती स्टॅलिन यांना निवडावी लागेल. त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव असेल.
दुसरीकडे, अण्णा द्रमुकमध्ये प्रचंड गटबाजी आणि नेतृत्वपदासाठी अनेक दावेदारांमध्ये चाललेली स्पर्धा यामुळे हा पक्ष पोखरला गेला आहे. मुख्यमंत्री पलानीसामी, उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासह पक्षात आणखी एक मजबूत गट टी. टी. व्ही. दिनाकरन यांचा आहे. परंतु या तिघांचे व्यक्तिमत्त्व कोणताही करिष्मा करून दाखवेल, असे वाटत नाही. करुणानिधी आणि जयललिता यांच्या श्रेणीत बसू शकेल असा एकही नेता दोन्ही पक्षांकडे नाही.
त्यामुळे यापूर्वी तमिळनाडूत चेहरा पाहून मतदान केले जात होते. आता मात्र मतदानाने नवा चेहरा ठरवला जाण्याची वेळ आली आहे. तमिळनाडूच्या राजकारणातली ही पोकळी हेरूनच दोन सुपरस्टार राजकारणाकडे आकर्षित झाले आहेत. मक्कल निधी मय्यम या नव्या पक्षासह कमल हासन राजकारणात उतरले आहेत तर दुसरीकडे रजनीकांत आपल्या चाहत्यांच्या आधारे संघटन तयार करून नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी चाचपणी करीत आहेत. रजनीकांत यांची राजकीय इच्छा अद्याप स्पष्ट झालेली नाही. परंतु त्यांचे काही साथीदार भाजपशी संलग्न आहेत आणि रजनीकांत यांच्याकडून त्यांना अपेक्षा आहेत.
रजनीकांत आणि अण्णा द्रमुकमधील पन्नीरसेल्वम यांच्या गटाचे एकत्रीकरण करून महाआघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात संघ परिवार असल्याचीही चर्चा आहे. परंतु या दोन्ही नव्या नेत्यांबाबत राजकीय विश्‍लेषकांमध्ये निराशा दिसून येते. लोकप्रिय असण्याचा संघटनकौशल्य आणि नेतृत्वाशी काहीही संबंध नाही, असे विश्‍लेषकांचे म्हणणे असून, राजकारणाचा खेळ या दोघांना जमेल का, याबाबत साशंकता आहे. जयललिता किंवा करुणानिधी यांच्या तत्त्वप्रणालींशी लोक सहमत किंवा असहमत असू शकतात. परंतु त्यांच्यासारखे नेते आज तमिळनाडूच्या राजकारणात नाहीत, अशीच सर्वसाधारण भावना आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)