मेनूकार्ड

काही निमित्ताने आणि कधी कधी कारणाशिवायही आपण हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर टेबलावर प्रथम वेटर आणून देतो ते मेनूकार्ड! त्या ठिकाणी मिळणाऱ्या सर्व पदार्थांची यादी आणि त्याची किंमत यावरून आपल्याला सोयीचे व्हावे म्हणून ही मेनूकार्डची पद्धत पडली असावी.

इडली, डोसा, उतप्पा, पंजाबी भाज्या, सूप्सचे प्रकार, डेझर्ट, मिल्कशेक्‍स, आईस्क्रीम आणि बरेच काही, अशी ही यादी बरीच मोठी असते. परवा एका हॉटेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला आणि मेनूकार्डमधील काही पदार्थांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यात होते “वरण-भात’ आणि “वरणफळे’, फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात. हे पदार्थ वाचून मला हसावे की रडावे हे कळेना. हे पदार्थ हॉटेलमध्ये मिळतात किंवा ते तिथे जाऊन खाण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे हे वाचून कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. हे लक्षात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमच्या लहानपणी सकाळी जेवणाची सुरुवातच वरण भाताने व्हायची. सणावारी आणि लग्न समारंभात देखील जेव्हा पंक्ती मांडून जेवायची पद्धत होती तेव्हा सुद्धा प्रथम वरण-भातच वाढला जायचा. संध्याकाळी आणि सकाळी कधीतरी खाणे केले जाई तेव्हा बहुतेक वेळा फोडणीची कांदा घालून केलेली पोळी आणि परतलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट असे. फारतर कधी कधी कांदा मटर घालून पोहे किंवा उपमा केला जात असे. दुपारच्या खाण्यातदेखील पोळीच चहाबरोबर किंवा शिखरण पोळी खायला असे.

इडली, डोसा वगैरे पदार्थदेखील फारसे घरी होत नसत. कधीकाळी हॉटेलमध्ये जाऊन 2 रु. ला डोसा खाण्याची आठवण अजूनही ताजी आहे. आताच्या सारखे पंजाबी पदार्थांची रेलचेल नव्हती. इटालियन, मेक्‍सिकन, चायनिज, पाव भाजीसुद्धा नव्हती. पिझ्झा, बर्गर, मोमोज, वेफर्स केक्‍स, पॅटीस वगैरे गोष्टी माहितीही नव्हत्या. आता पदार्थांत खूपच विविधता आहे. उदर-भरणासाठी वेगवेगळी हॉटेल्स विविध पदार्थ तयार करून तुमची खाण्याची हौस भागवित आहेत आणि त्याकरिता फक्त कार्ड तुम्हाला मशिनमध्ये सरकवावं लागत आहे. रोख पैसे देण्याचीसुद्धा गरज नाही.

हॉटेलमधील पदार्थांची गुणवत्ता त्याचं पोषण मूल्य, हॉटेलच्या किचनमधील स्वच्छता, वापरलेला कच्चा माल, तिथले आचारी, त्यांची शारीरिक स्वच्छता हा लिखाणाचा स्वतंत्र विषयच होऊ शकेल. हॉटेलमध्ये जाऊच नये असे नाही कारण अडचणीच्या काळात, प्रवासामध्ये, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेल्यावर यामुळेच अनेकांची जेवणाखाण्याची सोय होते हे विसरून चालणार नाही. मागे एका लग्नात एका कल्पक केटरने लग्न लागल्यानंतर लहान मुलांसाठी 10 वाजता गरम वरण-भात तयार आहे, अशी सूचना केली होती. ती कल्पना मला फार आवडली होती. कदाचित अशाच काही कारणांनी हे पदार्थ “मेनूकार्ड’वरही विराजमान झाले असतील. पण तरीही “वरण-भात’ किंवा फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी हा घरात बनवायचाच पदार्थ आहे हे गृहिणींनी तरी कृपया विसरू नये.

– आरती मोने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)