मेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा

रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांच चाकण ठाण्यावर मोर्चा ः पोलिसांना निवेदन

महाळुंगे इंगळे-ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार मागासवर्गीय दाम्पत्याचे पैसे लाटून त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करून हल्ला करणारे भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मुरलीधर मेदनकर (वय 55, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन पक्षाच्या या भागातील कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 20) चाकण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

ग्रामपंचायतीचा कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ठेकेदार प्रियांका शिवाजी झोंबाडे (वय 22, सध्या रा. बंगला वस्ती, मेदनकरवाडी; मूळ रा. कुरूळी, ता. खेड) यांची बॅंकेत जमा झालेली रक्कम अधिक पैसे देण्याच्या खोट्या आमिषाने काढून मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांनी काढून घेतली. लाकडी दांडक्‍याने संबंधित महिला प्रियांका झोंबाडे व तिचा पती शिवाजी झोंबाडे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. प्रियांका झोंबाडे या कॉंट्रक्‍टर महिलेने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रामदास मेदनकर व त्यांचा मुलगा संकेत यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही चाकण पोलीस ठाण्यात गेली चार महिने हेलपाटे मारूनही आमची तक्रार घेतली नाही, असा आरोप प्रियांका झोंबाडे यांनी केला आहे. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली. मात्र, त्याच दिवशी रात्री उशिरा माजी सरपंच रामदास मेदनकर यांचीही खोटी तक्रार घेतल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व या दाम्पत्याने केला आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हरीश देखणे, खेड तालुकाध्यक्ष संतोषनाना डोळस, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव आदींनी रामदास मेदनकर यांना तत्काळ अटक करावी, या मागणीचे लेखी निवेदन येथील पोलिसांना दिले. याप्रसंगी येथील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • संबंधित या प्रकरणातील ठेकेदार महिला प्रियांका झोंबाडे व त्यांचे पती शिवाजी झोंबाडे या दाम्पत्याला माजी सरपंच रामदास मेदनकर व त्यांचे काही कार्यकर्ते जाणूनबुजून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी येथील पोलीस प्रशासनाने घ्यावी.
    – संतोषनाना डोळस, तालुकाध्यक्ष रिपाइं 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)