मेढ्यात बेकायदा दारू विक्रीला उधाण

विक्रेत्यांना राहिले नाही प्रशासनाचे भय
प्रसाद शेटे
मेढा, दि. 12 – जावळी तालुक्‍यातील अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे सपोनि जीवन माने यांनी सांगितले असले तरी मेढा, केळघर येथे छुप्या पध्दतीने तर हॉटेल गारवा ढाब्यावर उघड उघड अवैध दारु विक्री सुरू आहे. धाड घालुनही जाग्यावर काहीच मिळत नसलेल्या या अवैध दारु धंद्याबाबत पोलिस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, तालुक्‍यातील अवैद्य धंद्यांवर आळा बसविणे त्यांच्यासमोर आव्हानच ठरणार आहे.
व्यसनमुक्ती संघटनेचे राज्यध्यक्ष विलास बाबा जवळ यांनी महिलांनी उद्‌ध्वस्त होत असलेले संसाराचा विचार करुन अवैध दारुधंद्यावर आळा घालण्याचा खूप मोठा लढा उभा केला. दारुबंदीचा पहिला तालुका म्हणून जावळी तालुक्‍याची ओळख राज्यात झाली. पण आता मात्र सर्वात जास्त बेकायदेशीर दारू विकणारा तालुका म्हणून ओळख होऊ लागली आहे. व्यसन मुक्ती संघटनेने मध्यंतरी केलेल्या दारू जाळ आंदोलनाने काही काळ या दारू विक्रेत्यांना लगाम घातली होती.
अवैध दारु विक्रीचे रॅकेट स्ट्रॉंग असल्याचे दिसून येते. या दारु धंद्यावर धाड घालुनही त्याजागी मात्र काहीच सापडत नाही यावरुन अवैध दारु विक्रेते पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहेत. तर एकीकडे दारू विक्रेत्यांची दारू विकताना व्हिडिओ क्‍लिप सोशल मीडियावर वायरल असून सुद्धा या विक्रेत्यांना उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन यांचे भय राहिले नाही. परंतु दारुबंदीचा जावळी तालुक्‍यात 2007 साली केलेल्या ठरावात दारू विक्री करण्यास बंदी असून सुद्धा कोणताही ठोस परिणाम तालुक्‍यातील दारु धंद्यावर झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी उलट तालुक्‍यात दारु धंदा वाढला आहे. दारुची छुप्या पद्धतीने होणारी वाहतुकीला आळा घालण्यास पोलिस प्रशासन कमी पडल्याचे बोलले जाते. दारू बंदीनंतरही ग्रामीण भागात दारु येतेच कशी असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. जिल्ह्यात दारुच्या आहारी जावून अनेक मारामारी तर काही खुनाच्या घटनाही घटना घडल्या आहेत.
मेढ्याचे दिवंगत सपोनि. राजेश नाईक यांनी धडक कारवाई करत अनेक अवैध धंद्यावर जरब बसवला होता. अगदी दारू विक्रेत्यांच्या कॉलरला धरून पोलिस स्टेशनपर्यंत धिंड काढली होती. त्यांच्यानंतर तालुक्‍यात पुन्हा अवैध दारु, मटका व जुगाराची पाळे रुजू लागली. ही पाळेमुळे खणुन काढण्यात प्रशासन कोणत्या नव्या युक्‍त्या वापरतात. याकडे तालुक्‍यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्‍यातील विशेषत: मेढ्यातील काही भागात दारु धंदे जोमाने सुरू आहेत. कारवाई झाली तरी पुन्हा या धंदा सुरू होतो. अशा काही धंद्यांना खाकी वर्दीचे अभय असल्याचे नागरिकांकडून बोलण्यात येते. दारु धंद्यावरील धाडीची माहिती आधीच अवैध धंदे करणाऱ्यांना कशी मिळते, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)