मेढा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

मेढा नगरीमधून निघालेला भव्य दिंडी सोहळा. (छाया : प्रसाद शेटे)

मेढा, दि. 4 (प्रतिनिधी)- मेढा, ता. जावळी येथे भाविकांच्या अलोट गर्दीत, भक्तीमय वातावरणात श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. या निमित्त निघालेल्या भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळ्याने मेढानगरीला भक्तीमय वातावरण प्राप्त झाले.
जावळी तालुका वारकरी संघ तथा जगद्‌गुरु श्रीतुकोबाराय चरिटेबल ट्रस्ट जावळी यांच्या विद्यमाने दर पाच वर्षाने तालुकास्तरीय अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. यंदाही श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह व पारायण सोहळयाच्या निमित्ताने आयोजित केलेला दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या जावळी तालुका वारकरी संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळयात सात दिवस श्री. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन झाल्यानंतर भव्य दिव्य दिंडी सोहळा तसेच कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि पुरण पोळीच्या प्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
मेढा येथील पोलिस परेड ग्राउंडच्या भव्य प्रांगणात या पारायण सोहळयाचे यंदाचे तिसरे वर्ष होते. या पारायण सोहळ्यामध्ये 100 महिला तसेच 150 पुरुषांसह अनेक वाचक सहभागी झाले होते. तसेच पंचक्रोशीतूनही मोठ्या संख्येने भाविक भक्त या सोहळयामध्ये सहभागी होते. तर वारकरी सांप्रदयातील विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण पारायण सोहळ्यामध्ये बाळकृष्ण महाराज शिंदे , मोहन बापू वारागडे, विलासबाबा जवळ, पांडुरंग संकपाळ, पांडुरंग धनावडे, आनंदराव महाराज मिस्त्री, धोंडीराम महाराज संकपाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
सात दिवस श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर दिनांक 3 जानेवारी रोजी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा ठेवून टाळ -मृदुंगाच्या तालावर, डोक्‍यावर कलश, तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊलींच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एस टी डेपो मेढा येथे भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. या सोहळ्याचा सांगता दिवशी कीर्तनसम्राट बंडा तात्या कराडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविकांमध्ये अध्यात्म आणि व्यसनमुक्तीचे एक चैतन्य निर्माण झाले. भक्तांना 51000 पुरणपोळीचा महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. या दिवशी मेढानगरीला प्रति पंढरपूर अवतरले होते.

आमदारहि झाले कीर्तनात दंग …
मेढा येथे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला एक भव्य स्वरूप आले होते . या सोहळ्यामधे रात्री ह.भ.प.उमेश महराज दशरथे यांच कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनामध्ये अचानक सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती दाखवली तसेच हातात टाळ घेऊन कीर्तनात मग्न झालेले आमदारांचे एक आगळे वेगळे वारकरी रूपही उपस्थित भाविकांना पहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)