मेढा बाजार चौक ते देशमुख आळी रस्त्याची दुरवस्था

मेढा ः बाजार चौक ते देशमुख आळी दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे. (छाया ः कमलाकर शेटे)

नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्‍त
मेढा, दि. 12 (वार्ताहर) – जावळी तालुक्‍याच्या मेढा तसेच परिसरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पहावयास मिळते. त्यात मुख्य बाजारपेठ ते देशमुख आळी या मुख्य रस्त्याची अवस्था तर पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या बाबीकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
मेढा गावातील अतिशय महत्त्वाचा असणारा मुख्यबाजार पेठ-लक्ष्मी रोड ते देशमुख आळी रस्ता या रस्त्यावरून विशेष म्हणजे 8 नगरसेवक रोज ये-जा करत असतात. हा मार्ग मेढा नगरपंचायत मधील 5-6 प्रभागांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. तसेच येथील गणपती मंदिरात, विठ्ठल मंदिरात परिसरातील येणारे भाविक याच मार्गाने येतात. अशा या सततच्या वर्दळीच्या रस्त्याची अवस्था सद्यस्थितीला पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यावर इतके मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे की वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या कारणामुळे या मार्गावर रोज छोटे-मोठे अपघात घडत असतात. या रस्त्यावर मागील पाच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी वापरून हा रस्ता बनवला होता. परंतु एका वर्षातच पाईप लाईन बदलण्यासाठी रस्ता पुन्हा खोदला होता. या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी खासदार, आमदार व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचीदेखील नेहमीच ये-जा होत असते. त्यांच्या या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात येऊ नये याला दुर्भाग्यच म्हणावे लागेल. अशा प्रकारचा दबका सूर येथून नागरिकांमधून निघत आहे. तसेच लोकप्रतिनिधीकडून रस्ता मंजूर झाला आहे, काम थोड्याच दिवसात सुरू होईल अशी भंपक उत्तरे नागरिकांना मिळत आहेत. मग नक्की रस्त्याचे घोडे अडले कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. आधीच हा रस्ता अरुंद त्यात खड्ड्यांचे साम्राज्य, मोठी कसरत करून नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत मेढा या बाबीकडे आपले लक्ष केंद्रित करेल का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)