मेट्रो, रिंगरोड, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनावर भर

पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पातील तरतुदी

प्रकल्पाचे नाव – अंदाजपत्रकीय तरतूद
रिंगरोड – 1 हजार 235 कोटी
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो – 888 कोटी
म्हाळुंगे टीपी स्कीम – 152 कोटी
प्रादेशिक आराखड्यातील रस्ते – 124 कोटी
अग्निशमन केंद्र – 50 कोटी
पीएमआरडीए इमारत – 50 कोटी
वाघोली पाणीपुरवठा योजना – 25 कोटी
पीएमआरडीए विकास आराखडा – 22 कोटी
घन कचरा व्यवस्थापन – 10 कोटी’
पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे – 9 कोटी
प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी रस्ते – 7 कोटी
इंद्रायणी नदी विकास प्रकल्प -6 कोटी
इतर विकास कामे-12 कोटी

पीएमआरडीएच्या 2 हजार 591 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी

पुणे -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 2018-19 या वार्षिक अर्थसंकल्पाची बैठक झाली. या बैठकीत पीएमआरडीएच्या 2 हजार 591 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, रिंगरोड, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई येथील विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविणसिंह परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पीएमआरडीए रिंगरोड, मेट्रो, टीपी स्कीम असे मोठे प्रकल्प हाती घेतले आहे. आता या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. पुणे आणि आजूबाजूचा परिसराच्या विकासासाठी पीएमआरडीए सज्ज आहे. किरण गित्ते, आयुक्त पीएमआरडीए

या बैठकीत पीएमआरडीएच्या 2 हजार 591 कोटी 77 लाख रुपये इतक्‍या अंदाजपत्रकीय तरतुदीस मान्यता देण्यात आली. यामध्ये रिंगरोडसाठी 1 हजार 235 कोटी, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी 888 कोटी, म्हाळुंगे टीपी स्कीमसाठी 152 कोटी, रस्ते व पूल बांधणीसाठी 99 कोटी, वाघोली पाणीपुरवठ्यासाठी 25 कोटी, अग्निशमन केंद्रासाठी 50 कोटी अशी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगत सुमारे 39 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये अग्निशमन केंद्रांची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन पीएमआरडीएने वाघोली येथे 15 कोटी रुपये खर्च करून नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच एकात्मिक नगर वसाहतीने तयार केलेल्या 3 अग्निशमन केंद्र भागीदारी पध्दतीने चालविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

दीर्घकालीन पाणी नियोजन करावे
पुणे शहराच्या पश्‍चिमेस हिंजवडी, सूस, म्हाळुंगे, पिरंगुट आदी गावांसाठी तर पूर्व भागात वाघोली व परिसरासाठी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यास या बैठकीमध्ये मान्यता घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील उपलब्ध पाणी वापरात बचत करून पीएमआरडीएस पाणी आरक्षण देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पीएमआरडीएने दीर्घकालीन पाणी नियोजन करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

नियोजित आणि वेगाने विकास
पीएमआरडीएकडून म्हाळुंगे येथे 250 हेक्‍टरवर टीपी स्कीम राबविली जाणार आहे. त्यासाठी हुडको या वित्तीय संस्थांकडून 619 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे म्हाळुंगे परिसराचा विकास नियोजित आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)