मेट्रो दुर्घटनेवरून आरोपांच्या फैरी

पिंपरी- मेट्रोचे काम सुरु असताना नाशिक फाटा येथे पायलिंग रिग मशीन कोसळल्याची दुर्देवी घटना शनिवारी (दि. 5) दुपारी घडली. या घटनेवरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या कामाला माल पुरविण्याचे विविध ठेके सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांनाच दिले असल्याने ही घटना झाल्यानंतरही कित्येक तास सत्ताधारी भाजपचा एकही जबाबदार पदाधिकारी घटनास्थळी फिरकला नसल्याचा आरोप करत सुरक्षेचे उपाय केल्याशिवाय मेट्रोचे काम सुरु करु देणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला. तर आरोप केल्याशिवाय साने यांचा एकही दिवस जात नाही, असे प्रत्युत्तर महापौर राहुल जाधव यांनी दिले आहे.

पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने काम सुरु आहे. मेट्रोच्या मार्गिकेतील कासारवाडी येथे उभारलेल्या पीलरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब यापूर्वी निदर्शनास आली होती. त्यानंतर या पीलरचे ऑडिट झाल्यानंतर तो धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने, हा पीलर तोडण्याची नामुष्की मेट्रो प्रशासनावर आली होती. या घटनेतून कोणताही बोध मेट्रो प्रशासनाने घेतला नसल्याचे या दुर्घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दत्ता साने म्हणाले, खबरदारीच्या उपाययोजना न करता महामेट्रोकडून दिवसा सुरु असलेल्या कामामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्‍यात घातला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रोने रात्रीचे काम करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. दिवसा काम केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस काम बंद पाडेल असा इशारा त्यांनी दिला. आज झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी. महामेट्रो, महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अथवा काळ्या यादीत टाकावे. महामेट्रोची एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर अनेक तासांनी सत्ताधारी पदाधिकारी याठिकाणी पोहचले. त्यांना जनतेचे काही घेणे-देणे राहिले नाही, असा आरोपही साने यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरोधकांचे आरोप झाल्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल उपस्थित होते. मेट्रोचे काम सुरु असताना, सुरक्षेचे सर्व उपाय प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला दिल्या.

महामेट्रोची घडलेली घटना दुर्देवी आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. यापुढे महामेट्रोने जबाबदारी सांभाळून काम करावे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुदतीत काम पुर्ण करावे. तसेच घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली होती. त्यानंतर घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. चौकशीची आवश्‍यकता असल्यास चौकशी देखील केली जाईल.
– राहुल जाधव,
महापौर, पिंपरी-चिंचवड.

देखरेखीसाठी समिती नेमा – चिखले
मेट्रोच्या कामकाजावर देखरेखीसाठी नगरसेवक व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमावी, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मेट्रोने सुरुवातीच्या काळात सुरक्षेचा देखावा केला. मात्र, कालांतराने त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. आजच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मेट्रोचे काम सुरू असताना नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे या घटनेवरुन उघड होत असल्याचे चिखले यांनी म्हटले आहे.

अन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू – दाखले
सुदैवाने आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरवासियांचा जीव धोक्‍यात आहे हे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजवावी. सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल कारवाई करावी. जोपर्यंत सर्व सुरक्षेची जबाबदारी घेतली जात नाही. तोपर्यंत मेट्रोला कामास परवानगी देवू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने मेट्रोचे काम बंद पाडू, असा इशारा शिवसेनेचे उपविभागप्रमुख युवराज दाखले यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)