मेट्रोला संरक्षण विभागाचा ‘ग्रीन सिग्नल’

विक्रमी वेळेत परवानगी : डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी-दापोडी मेट्रो धावणार

पिंपरी – पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावावी, अशी मागणी होत आहे. आता डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी ते दापोडी मेट्रो धावणार असल्याचा दावा थेट महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. “मार्गिका एक’मध्ये मोठा पट्टा संरक्षण विभागाच्या मालकीच्या जागेत आहे. संरक्षण विभागाकडून परवानगी घेणे ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. परंतु ही अवघड प्रक्रिया मेट्रोने विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामेट्रोने पिंपरी ते निगडीपर्यंत “डीपीआर’ सादर केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील यास मंजुरी देऊन राज्य सरकारकडे पाठवला आहे. आता राज्य सरकार या प्रकल्पास मंजुरी देऊन केंद्र सरकारकडे पाठवेल. त्यानंतर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळेल. गतवर्षी सरकारने एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. यंदाही केंद्र आणि राज्य सरकारचा अर्थसंकल्प लवकरच सादर होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. यामुळे “डीपीआर’लाही मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. यामुळे 2019 मध्ये निगडीपर्यंत मेट्रोचे काम सुरू होण्याची आशा व्यक्‍त केली जात आहे.

सध्याच मेट्रोने संत मदर टेरेसा उड्डाणपूल ओलांडून चिंचवडपर्यंतचे उड्डाण घेतले आहे. यामुळे पुढील अंतर देखील कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. दापोडीच्या हॅरिस पुल ते पिंपरीतील पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापर्यंत असा 8 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रो नव्या वर्षात डिसेंबरअखेरीस धावणार आहे. त्या दृष्टीने महामेट्रोने नियोजन केले आहे. हे नियोजन कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण केले जाणार आहे, असा दावा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे.

डॉ. दीक्षित म्हणाले की, दापोडी ते पिंपरी मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे डिसेंबर 2019 पर्यंतचे नियोजन आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. पिंपरी ते रेंजहिल्स या रिच वन’चे दोन वर्षांत तब्बल 40 टक्के काम मार्गी लागले आहे. वेळापत्रकानुसार हा टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात महामेट्रोला यश आले आहे. वल्लभनगर एसटी आगारात उपलब्ध झालेल्या जागेत “पॉवर सब स्टेशन’चे काम सुरू झाले आहे. लवकरच लोहमार्ग, सिग्नल यंत्रणा, सुरक्षा कठडे, वीज पुरवठा केबल टाकण्याचे काम सुरू होणार आहे. राज्य व केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर महामेट्रोकडून प्रकल्प कामाची भूमिका सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी ते दापोडीपर्यंतचे काम जोरदार सुरू असतानाच दापोडीच्या पुढे मात्र काम सुरू होऊ शकले नव्हते. कारण संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक होती. परंतु, ही परवानगी विक्रमी वेळेत मिळवली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, ऍम्युनिशन फॅक्‍टरी, संरक्षण विभागाच्या हद्दीतील खडकी ते रेंजहिल्स या मार्गाची व दापोडीतील मेट्रो स्टेशनच्या जागेची परवानगी आता मिळाली आहे. त्या संदर्भात लवकरच संरक्षण विभागाशी करार करून जागेच्या मोबदल्यात रक्कम अदा केली जाणार आहे.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)