मेट्रोमुळे आयटीयन्सची कार्यक्षमता वाढणार – देवेंद्र फडणवीस

पुणे – हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या कार्यरत आहेत. येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दोन ते चार तास प्रवासात जातात. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, मात्र नव्याने होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे या वेळेत बचत होणार आहे. परिणामी गतिमानता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आयटी हब असलेले हिंजवडी जगाला मानव संसाधन पुरवते. याच ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते. हा भाग शिवाजीनगरशी मेट्रोच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळे प्रगतीचे नवे दालन खुले झाले आहे. केंद्राच्या नव्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या या नव्या धोरणानुसार सर्वांत पहिला मेट्रोचा प्रकल्प पुण्यात होत आहे. मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. पीएमआरडीए महाराष्ट्रातील विकासाचे क्षेत्र होईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात सुरू करण्यात येणाऱ्या रिंग रोड, हायटेक सिटी, इलेक्‍ट्रिक बसेस आदी प्रकल्पांचा उल्लेख केला. पीएमआरडीएच्या माध्यमातून तसेच लोकांच्या सहकार्यातून या भागाचा सुनियोजित विकास साधण्यावर आपला भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, पुणे शहराशी माझा जवळचा संबंध राहिला आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातले सर्वांत प्रगतशील शहर म्हणून पुण्याचा विकास होत आहे. पुणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असल्याचे सांगत स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे कामाचे कौतुक केले.

“पुणे तिथे काय उणे, नरेंद्र-देवेंद्रजी पुणे तिथे नो उणे, आपण निधी देणे आम्ही विकास करणे’ अशी चारोळीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, कमी कालावधीत पुण्यात मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. हिंजवडी मेट्रोचा विस्तार वाढत राहणार असून शिवाजीनगर पर्यंतची ही मेट्रो हडपसरपर्यंत नेण्याची आवश्‍यकता आहे. पुण्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी पुणे शहरासाठी आला आहे. मागील साडेचार वर्षांत पुण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहे. यामध्ये तीनही मेट्रोसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये, स्मार्ट सिटीमध्ये 4 हजार 768 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर राष्ट्रीय महामार्गांची सुमारे 16 हजार 800 कोटी रुपयांची कामे होणार आहेत. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबरोबच पुरंदर येथील विमानतळाच्या कामालाही गती मिळत आहे.

पुणे होणार सुनियोजित शहर
आघाडी सरकारमधील आपाआपसातील भांडणामुळे पीएमआरडीएची स्थापना होऊ शकली नाही. मात्र आमचे सरकार आल्यानंतर पीएमआरडीए गठीत करण्याचा निर्णय घेतला. पीएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो, रिंगरोड, म्हाळुंगे हायटेक सिटी आदी विकास कामे सुरू आहेत. पीएमआरडीएमुळे सुनियोजित शहर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)