मेट्रोच्या संथगतीचा महापालिकेला फटका

पिंपरी- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी विद्युत पोल काढून टाकण्यासाठी आठ महिने विलंब झाला आहे. त्यापोटी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. मात्र, अद्यापही मेट्रोचे काम सुरूच असल्याने या रकमेतच सर्व विद्युत पोल काढावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराला भाववाढ देण्याची नामुष्की महामेट्रोवर ओढावली आहे.

पुणे मेट्रोला मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात या कामाला सर्वात प्रथम सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते दापोडी या दरम्यान पहिल्या टप्प्यात हे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करताना महामार्गावरील विद्युत पोल अडथळा ठरत आहेत. हे सर्व पोल काढण्याची निविदा महापालिकेकडून गेल्यावर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 30 ऑगस्ट 2017 ला या कामाचा ठेका मेसर्स इलेक्‍ट्रोमेकॅनिक्‍स या ठेकेदार कंपनीला देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने या कामासाठी 29 डिसेंबर 2017 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, पुणे मेट्रो प्रकल्पाचे नकाशे अंतिम नसल्याने 31 मार्च 2018 पर्यंत या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही मेट्रोच्या पिलरचे काम अंतिम नसल्याने ऑगस्ट 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही मेट्रोचे काम सुरूच आहे. परिणामी विद्युत पोल काढण्यास विलंब होत आहे. या कामाकरिता महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने भाववाढ आणि फरक बिलापोटी महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. या कामातील भाववाढ आणि ठेकेदार कंपनीला बील देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

संथगती कामामुळे वाहतूक कोंडीत भर
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पुणे मेट्रोचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी बीआरटीएस लेनवर काम सुरु असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. सकाळी व सायंकाळी “पिक अवर’मध्ये महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रोचे शहरातील काम पूर्ण होईपर्यंत महामार्गावरील विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम सुरू
शहरात महामार्गावरील कासारवाडीपासून मेट्रोचे काम सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत 1.09 किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी रस्ता खोदावा लागला आहे. आता हे काम पूर्ण झाल्याने, याठिकाणच्या रस्ता दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण झाल्यानंतर, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)