मेट्रोच्या कामामुळे कोंडी, कोंडीमुळे मेट्रोला अडचण

पिंपरी – महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे पिंपरी ते स्वागरेट या मार्गिकेचे काम सध्या जोरात सुरू आहे. परंतु या कामामुळे सध्या शहरातील दोन ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या भेडसावत आहे, परंतु येथे रस्त्यावरच होत असलेल्या व्यवसायामुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान मेट्रो आणि पालिका व वाहतूक पोलीस यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट जाणवत आहे. मेट्रोच्या कामामुळे आणि अतिक्रमणामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीचा मेट्रोलाही त्रास जाणवत आहे.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकफाटा येथे स्थानक आणि मार्गिकेचे काम सुरू आहे. यामुळे ग्रेड सेप्रेटरसोबत सर्व्हिस रोडवरील एक लेनमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे येथील वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसत आहे. कित्येकदा मेट्रोसाठी मालवाहतुकीचे काम करणारी वाहनांना देखील आत जाण्यास व बाहेर येण्यास खूप अडचण होत आहे. या कोंडीचा त्रास मेट्रोच्या कामालाही अप्रत्यक्षपणे होताना दिसत आहे.

“त्यांच्या’ वर कारवाई कधी?
नाशिक फाटा येथे सध्या एका लेनमध्ये चार लेनची वाहतूक होत आहे. असे असतानाही येथे वाहतूक कोंडी व्हावी इतका अरुंद रस्ता नाही तर हा रस्ता अरुंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला असलेले व्यावसायिक आपली दुकाने रस्त्यावरच मांडत असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या खासगी बस येथेच उभ्या राहतात. दिवसादेखील काही बस येथे उभ्या राहून माल भरत-उतरत असतात. वाहतूक कोंडीच्या मुख्य कारणांकडे वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे मत आहे. मेट्रोने सांगून देखील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यावसायिकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग गरीब फेरीवाल्यांवर तर कारवाई करते परंतु रस्त्यावरच कार बाजार भरवणाऱ्या आणि कार डेकोरेट करणाऱ्या बड्या व्यावसायिकांवर मात्र कारवाई करत नाही. मेट्रोकडून देखील याबाबत पाठपुरावा होणे अपेक्षित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंबेडकर चौकातही दैना
नाशिक फाट्याप्रमाणे आंबेडकर चौकात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरही रोज वाहतुकीची दैना होताना दिसत आहे. मेट्रोच्या कामामुळे येथे ही सिंगल लेन रोड उरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा पिंपरी चिंचवड परिसरातील गजबजलेला चौक असून, सर्व प्रकारची आंदोलने, मोर्चे, धरणे, सभा इत्यादी सामाजिक व राजकीय कार्यक्रम याच चौकामध्ये सतत होत असतात. त्यामुळे येथे वाहतूक सुरळीत राहणे खूप गरजेचे आहे. ही बाब ध्यानात घेत डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक ते खराळवाडी येथील ग्रेड सेपरेटर मर्ज इन पर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण 150 मीटर लांब व 4 मीटर रुंदीचे कॉंक्रीट करून वाहतूक सेवा या रस्त्यावरून सुरू केली आहे. या ठिकाणी रस्त्याचे साइडपट्टीचे काम देखील महामेट्रोकडून करण्यात आले आहे. या ठिकाणी महामेट्रोतर्फे 1 इन्स्पेक्‍टर ग्रेड- 1 , व 3 ट्रॅफिक मार्शल नेमण्यात आले असून कोणतेही वाहन या रस्त्यावर थांबू ने देण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु याचा काहीही फायदा होताना दिसत नाही. येथे अजूनही रिक्षा आणि अन्य वाहने उभीच असतात. त्यात कोणीही ज्यावर चालत नाही अशा पदपथाचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. मेट्रोचे काम सुरू असेपर्यंत पदपथ काढून रस्ता मोठा करणे अपेक्षित होते परंतु तसे न करताना जास्त वाहतूक कोंडी कशी होईल याकडेच लक्ष असल्याचे दिसत आहे. येथील रिक्षा स्टॅंड अधिकृत असल्याचे सांगत कारवाई टाळण्यात येत आहे. हे अधिकृत रिक्षाचालक अर्धा रस्ता अडवून उभे असतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)