मेट्रोच्या अहवालासाठी चार कोटींचा खर्च

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पुणे महामेट्रोला देण्यात येणार आहेत.

पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. तसेच नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मेट्रोसाठी जागा ठेवून काम करावे, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयात आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन आणि राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण हा मेट्रो मार्ग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याबाबत मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुचना देण्यात आल्या. तसेच महापालिकेमार्फत मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून डीपीआर तयार करण्याचा खर्च महापालिका देणार असल्याबाबत कळविण्यात आले.

महामेट्रोच्या कार्यकारी संचालकांनी पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या भाग दोनसाठी डीपीआर तयार करण्यासाठी सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेची सेवा घेण्यात येत असून डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याबाबत कळविले. तसेच या दोन्ही मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी मेट्रो मार्गाचे डीपीआर तयार करण्यासाठी 3 कोटी 84 लाख अधिक 12 टक्के जीएसटी म्हणजेच 4 कोटी 31 लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे नमुद केले. ही रक्कम महामेट्रोकडे वर्ग करण्याबाबत कळविले. ही रक्कम महापालिकेच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील केंद्र सरकार पुरस्कृत योजना आणि युटीएफ लेखाशिर्षावरील 50 कोटी तरतुदीमधून देता येईल. त्यानुसार, महामेट्रो यांना 4 कोटी 31 लाख रूपये थेट पद्धतीने करारनामा न करता महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव आगामी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)