मेट्रोचा पिलर डळमळीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या कासारवाडीच्या पिलरचे कॉंक्रीटीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने या पिलरचे गज उघडे पडले आहेत. भविष्यात या पिलरवरून मेट्रो धावल्यास हा पिलर वजन पेलू शकेल का नाही, असा गंभीर प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई रस्त्यावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे वेगाने सुरू झाले आहे. तीन वर्षांत या रस्त्यावरून पुण्यात ये-जा करण्यासाठी नागरिकांना तीन सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहेत. बीआरटी बस सेवा, रेल्वे आणि मेट्रो या वाहतूक सेवांमुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता येईल. पिंपरी महापालिका भवनापासून शिवाजीनगरपर्यंत मेट्रो रेल्वेची दहा स्थानके प्रस्तावित आहेत. मोरवाडी चौकापासून कासारवाडीदरम्यान मेट्रोचे खांब उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. पिंपरी महापालिकेपासून शिवाजीनगरपर्यंत एकूण 456 पिलर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड शहरातल 152 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय 190 फाऊंडेशन व 70 पिलर कॅपचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मेट्रो रेल्वे वातानुकूलित सेवा असून, नागरिकांना कमी वेळेत, आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणविरहीत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना पिंपरी महापालिकेपासून स्वारगेटपर्यंतच्या 16 किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ अर्ध्या तासात करता येईल. मात्र, हे काम करताना मेट्रो कॉपोरेशनच्या अनेक त्रुटी समोर येत आहेत. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील मेट्रोला नोटीस बजावली होती. याशिवाय पुणे मेट्रोचे काम सुरु असतानाच नागपूर मेट्रोचे फलक वापरल्याने मेट्रो कॉपोरेशनच्या कामकाजावर टीका झाली होती. दरम्यान, कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या पिलरचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या पिलरचे गज आताच बाहेर दिसू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात हा पिलर नेमका किती वजन पेलू शकेल, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मेट्रोच्या कामात फक्त सिमेंट आणि स्टीलच्या ठेक्‍यात स्वारस्य आहे. या निकृष्ट दर्जाच्या पिलर उभारण्यामुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत शहरात झालेल्या मेट्रोच्या कामाचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करावे. तसेच या कामात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)