मेकअप आणि सौंदर्य

आधुनिक युगात मेकअपची व्याख्या बदलली आहे. मेकअप हा आवश्‍यकच असतो अशी खात्री मुलींची झालेली आहे. प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असं वाटतंच. तर बदलत्या काळानुसार मेकअप करा. आधुनिक पोषाख वापरा आणि सुंदर सुंदर दिसा पण ते कसे….

मेकअप करताना तुम्हाला कुठं जायचं आहे ह्याचे भान ठेवा. रात्रीच्या वेळी पार्टीला वगैरे जायचे असेल तर मेकअप हा गडद व चमकदार हवा, पण दिवसाची वेळ असेल तर मात्र मेकअप हलका व नैसर्गिकच असला पाहिजे. मेकअप करण्यापूर्वी फेशियल करायला हवं. वाटल्यास त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी चेहऱ्यावर कॅडिला काकडीयुक्त फेस पॅक अथवा लॅक्‍मे रिव्हायलायझिंग फेस स्क्रब, समारा डीप क्‍लिजिंग मास्क वा कॅडिला ऑरेंज पील फेस मास्क लावा. नंतर ब्लिचिंग करा.

मान व पाठीवरही सिनर्जी एक्‍सफोलिएटिंग फेस स्क्रॅब किंवा एव्हरयुथ वॉलनट फेस स्क्रबचा वापर करा. त्यानंतरच ब्लिचिंग करा. यामुळे या भागाची त्वचा स्वच्छ व चमकदार दिसू लागेल.

हातापायांवर मॅनिक्‍युअर व पॅडिक्‍युअर करा. हातापायांवर अधिक लव असेल तर वॅक्‍सिंग अन्‌ कमी लव असेल तर ब्लिचिंग करा. नको असलेले केस ऍनफ्रेंचा वा फ्रेम हेअर रिमूव्हरने काढून टाका.

स्वच्छ त्वचेला मेकअप उत्तम खुलवतो. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी चेहरा, मान पाठ हात पायांची त्वचा स्वच्छ करणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी सर्वप्रथम या सर्व अवयवांची सिनर्जी वा समारा जेंटल क्‍लीजिंग फेसवॉशने स्वच्छता करा. नंतर मऊ कापसाच्या फायात समारा, लॅक्‍मे वा रेवलॉन एक्‍स्ट्रा जेंटल क्‍लिजिंग मिल्क घेऊन हे सगळे अवयव व्यवस्थित पुसा. नंतर त्यावर बर्फाने चोळा म्हणजे मेकअप दीर्घकाळ टिकून राहील.

त्वचा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवरील रोमछिद्र मोकळी होतात. ती बंद करण्यासाठी लॅक्‍मे रेडियन्स, रेवलॉन किंवा समाराच्या एस्ट्रेंजेंट टोनरचा वापर करा. एस्ट्रेंजेंट एक उत्तम स्कीन टोनर आहे व त्यामुळे त्वचेला नवी झळाळी येते. टोनर लावल्यानंतरच मेकअपला सुरुवात करा.

चेहऱ्याचा मेकअप….
चेहऱ्याचा मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर जर कसले डाग, जखमेचे व्रण, खुणा, डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील तर ती झाकण्यासाठी त्या ठिकाणी कन्सीलरचा वापर करा. डोळ्यांच्या खाली, नाकाच्या आजूबाजूला व खाली, ओठांच्या भोवताली व हनुवटीवर कन्सीलर लावून एकसारखं करा. कन्सीलर फाउंडेशनच्या रंगापेक्षा काहीसं सौम्य रंगाचं वापरा.

यानंतर फाउंडेशनचा वापर करा. फाउंडेशन हे मेकअपचा उत्तम आधार आहे. तुम्ही क्रीम द्रवरूप, केक वा स्टिकच्या रूपात फाउंडेशन वापरू शकता. त्वचेच्या रंगापेक्षा किंचिंत गडद रंगाचं फाउंडेशन वापरा. फाउंडेशन चेहऱ्यावर दीर्घकाळ टिकविण्यासाठी द्रवरूप फाउंडेशनमधे मॉइश्‍चरायजर वा गार पाण्याचे काही थेंब मिसळून चेहरा, मान, कानांवर एकसारखं लावा.

फाउंडेशन टिकविण्यासाठी कॉम्पॅक्‍ट पावडरचा वापर करा. तुमच्या फाउंडेशनच्या रंगाशी मिळता जुळता रंग असलेलीच कॉम्पॅक्‍ट पावडर वापरा. फाउंडेशन लावल्यानंतर पफने कॉम्पॅक्‍ट पावडर डोळ्यांखाली, नाकाच्या दोन्ही बाजूंना मानेला मागून पुढून लावून चेहऱ्यावर सर्वत्र सारखी करा.

नंतर कापसाच्या बोळ्याने अतिरिक्‍त पावडर काढून टाका. चेहऱ्याला गुलाबीपणा आणण्यासाठी गुलाबी रंगाच्या फेस पावडरचाच वापर करा. पावडर लावल्यावर गालांना नैसर्गीक लाली आणण्याकरिता ब्लशरचा वापर करतात. ब्लशर क्रीम व पावडर अशा दोन्ही प्रकारे वापरता येतो. गालांच्या हाडांवर म्हणजे चिकबोन्सवर ब्लशर वापरा. तो खालून वरपर्यंत पसरावा. याने गाल आकर्षक दिसतात. सर्वसाधारणपणे गुलाबी रंगाचा ब्लशर योग्य, उपयुक्त असतो. नाक, कान, हनुवटी व कपाळावरही ब्लशरचा अगदी हलका वापर करा.

डोळ्यांचा मेकअप… 
भुवयांचा आकार चेहऱ्याला अनुसरूनच करा. भुवयांना नैसर्गिक काळेपणा व दाटपणा येण्यासाठी आयब्रो पेन्सिल वापरा. तत्पूर्वी आयब्रो ब्रशने भुवया हलक्‍या हाताने पसरावा. नंतर आयब्रो पन्सिलने भुवयांना नैसर्गिक आकार व काळेपणा द्या म्हणजे भुवया आकर्षक होतील. डोळे सुदंर दिसण्यासाठी पापण्याच्या वर आयशॅडो लावा. पोशाख व तुमच्या रंगाशी मिळत्याजुळत्या आयशॅडोचाच वापर करा. वेळ प्रसंगानुरूप पावडर किंवा क्रीम स्वरूपातील आयशॅडो वापरा.

स्पंजच्या ऍप्लिकेटरने आयशॅडो पापणीच्या केसांपासून नाकाच्या बाजूच्या गालाच्या भागास लावा. नंतर ती वर भुवयांच्या दिशेने आयब्रोच्या बाहेरील काठापर्यंत नेत सारखी करा. दिवसा सौम्य रंगाची आयशॅडो वापरा.

डोळ्यांच्या कडांसाठी आयलायनर वापरा. त्यामुळे डोळे टपोरे व सुंदर भासतात. आयलायनर पेन्सिल तसंच द्रवरूपही मिळतो ब्रशने आयलायनरची डोळ्यांच्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूपासून पापण्यांच्या टोकापर्यंत एक पातळ रेषा काढा.
खालच्या बाजूला आयलायनर लावताना डोळ्यांच्या आतील कोपऱ्यांकडे पातळ रेषा काढा व बाहेरच्या दिशेने थोडी जाड रेषा काढा. आयलायनर तपकिरी, काळा, निळा, व हिरवा अशा चार रंगांत उपलब्ध आहे. तुमच्या बुबुळांच्या रंगाला अनुसरूनच आयलायनाचा रंग निवडा.

डोळ्यांच्या पापण्या काळ्या, लांब व घनदाट बनवण्यासाठी मस्कारा वापरा. मस्कारा क्रीम केक, वॉटरप्रुफ, द्रवरूपात मिळतो. मस्कारा लावण्याच्या ब्रशने पापण्यांच्या वरच्या व खालच्या मुळापासून बाहेरच्या काठापर्यंत मस्कारा लावा.
मस्काराचा एक थर वाळल्यानंतर त्याचा सुरेख परिणाम मिळण्यासाठी आणखी एक थर लावा. आजकाल मस्कारा काळ्या, तपकिरी व निळ्या रंगामध्ये मिळू लागलाय. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या रंगानुरूपच मस्कारा वापरा. डोळे टपोरे व छान दिसावे यासाठी विविध रंगात मिळणाऱ्या काजळाच्या पेन्सिलीने काजळ लावा. जर पापण्यांचे केस छोटे किंवा पातळ असतील तर कृत्रिम पापण्या (फॉल्स आय लॉशिस) लावा. डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी रंगीत कॉण्टॅक्‍ट लेन्सचाही वापर करू शकता. आजकाल हिरव्या, काळ्या, निळ्या भुऱ्या रंगांच्या कॉण्टॅक्‍ट लेन्सेस उपलब्ध आहेत.

– सुजाता गानू


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)