मेंदूतील रक्त वाहिन्यांचे आजार

मेंदूचा रक्तपुरवठा निसर्गाने फार चांगला ठेवलेला आहे. यात अनेक पर्यायी मार्ग असतात. मेंदू व चेतासंस्था ही अत्यंत नाजूक संस्था आहे. रक्तप्रवाहात दोन-तीन मिनिटे खंड पडला तरी मेंदूचा संबंधित भाग कायमचा बिघडू शकतो. हृदयविकाराच्या झटक्‍यात दोन-तीन मिनिटांत परत हृदयक्रिया चालू झाली नाही तर पुन्हा हृदयक्रिया चालू होऊनही उपयोग नसतो; कारण मेंदूतल्या पेशी तेवढ्या काळात मरण पावतात.

डॉ. सचिन जाधव

हृदयविकारात जसा रक्तप्रवाह खंडित होतो, तसाच मेंदूचा झटका असतो. यातही रक्तप्रवाह खंडित होतो. याची तीन प्रकारची कारणे असू शकतात. रक्तवाहिनीत गुठळी होणे. रक्तस्राव होणे. रक्तदाब अचानक कमी झाला तर मेंदूचा रक्तप्रवाह कमी होणे. यामुळे मेंदूच्या संबंधित भागातल्या पेशी मरून अवयव निकामी होतात. या आजाराचा एक प्रकार तात्पुरता असतो. याचे कारण म्हणजे रक्तदाब तात्पुरता कमी होऊन मेंदूच्या पेशींना कमी रक्त पोचणे. संबंधित अवयव (हात, पाय, चेहरा), इ. तात्पुरते (काही मिनिटे) दुर्बल होतात. पण 24 तासांत ही परिस्थिती सुधारते. लक्षणे रक्तप्रवाहातला खंड तात्पुरता असेल तर नुसती चक्कर येते किंवा शरीराचा संबंधित भाग तात्पुरता बिघडतो. यात झटका येतो किंवा शक्ती जाते.

अर्धांगवायू
रक्तप्रवाह दीर्घकाळ बंद पडला तर संबंधित भागातली शक्ती, हालचाल जाऊन लुळेपणा येतो. बिघाडाचे प्रमाण फार मोठे असेल तर शरीरात व्यापक बिघाड होतो. यामुळे इतर अंतर्गत संस्था बंद पडणे किंवा बिघडणे, बेशुध्दी, श्वसन किंवा हृदयक्रिया बंद पडणे, इत्यादी गंभीर परिणाम संभवतात. अशा लुळेपणालाच आपण ‘अर्धांगवायू’ किंवा ‘अंगावरून वारे जाणे असे म्हणतो. यामुळे मृत्यूही येऊ शकतो. कारणे भारतामध्ये या मेंदू-झटका/अर्धांगवायूचे प्रमाण हजारी लोकसंख्येत 2 इतके आढळते. या व्यक्ती उतारवयातल्या किंवा वृध्द असतात. वाढत्या वयोमानाने या आजाराचे प्रमाण समाजात वाढतच जाणार आहे. अतिरक्तदाब हे या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. एक तर या आजारात रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात. जादा रक्तदाबाने त्या फुटतात. छोटया रक्तवाहिन्या फुटल्या तर थोडे नुकसान होते व ते भरून येते. मोठया रक्तवाहिन्या फुटल्या तर खूप नुकसान होते. धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह, उतारवय, रक्तातील मेद वाढणे ही या आजारामागची महत्त्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे रक्तवाहिन्या फुटणे किंवा गुठळ्या होण्याची शक्‍यता निर्माण होते.

मेंदू घात
मेंदूचा रक्तपुरवठा अनेक मार्गांनी होत असला तर सर्वच रक्तवाहिन्या या कारणांनी खराब झालेल्या असतात. वरचा रक्तदाब 70 पेक्षा कमी झाला तर असा मेंदू घात होऊ शकतो. याला विविध कारणे आहेत. हृदयविकाराचा झटका हे त्याचे प्रमुख कारण असते. तसेच अतिरक्तदाबावर नियमित उपचार करणे हे मेंदू-आघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णांना हे पटवले पाहिजे. मेंदूच्या विशिष्ट भागात शरीराच्या विशिष्ट भागांचे नियंत्रण असते. तसेच मेंदू व चेतारज्जूच्या विशिष्ट भागातून संबंधित शरीराच्या संदेशांची ने-आण होत असते. नियंत्रण करणारा भाग किंवा संदेशवहन सांभाळणारा भाग यापैकी कोणत्याही भागात बिघाड होऊ शकतो. या भागामध्ये दाब येणे, रक्तपुरवठा बंद पडणे, पू होणे, मार लागणे यापैकी काही झाल्यास शरीराच्या संबंधित भागात शक्ती कमी होते किंवा लुळेपणा येतो. लक्षणे व चिन्हे अर्धांगवायू याप्रमाणे येतो.
अ) उभ्या शरीराचा अर्धा भाग (एक हात व पाय), चेहऱ्याचा अर्धा भाग किंवा
(ब) कमरेखाली दोन्ही पाय, मेंदूच्या एका (डाव्या किंवा उजव्या) भागात बिघाड झाला तर डोक्‍याखालच्या भागातील शरीराची विरुध्द बाजू बिघडते.

तात्पुरता किंवा कायमचा अर्धांगवायू
अर्धांगवायू कधीकधी तात्पुरता असतो, तर कधीकधी कायमचा. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसांत शरीराचा कोणकोणता भाग लुळा पडणार हे ठरून जाते. दोन-तीन महिन्यांनंतर काही रुग्णांमध्ये थोडीथोडी सुधारणा होण्याची शक्‍यता असते. मात्र, काही जणांच्या बाबतीत सुधारणा होत नाही. मानसिक, शारीरिकदृष्टया खचल्याने बरेच रुग्ण या आजारात दगावतात. मेंदू आघाताचे वेळीच निदान करण्यासाठी खालील खुणा महत्त्वाच्या आहेत. यातले एकही चिन्ह असल्यास सावध व्हावे आणि वैद्यकीय मदत मिळवावी. चेहऱ्याचे स्नायू सैलावणे. हात सैल व अशक्त होणे. बोलण्यात बदल-अवघडलेपण रुग्ण बोलू शकत नाही किंवा बोलणे अस्पष्ट होते. रक्तदाब वाढलेला असू शकतो. किंवा अगदी कमीही असू शकतो.

त्वचेवर बधिरता – संवेदना कमी होणे
विचित्र वास, चव, ध्वनि किंवा दृष्टीभ्रम होणे. डोळ्यांच्या पापण्या जडावणे, अर्ध-मिटल्या होणे. गिळण्याची क्रिया अवघड जाणे एका डोळयाची बाहुली विस्फारणे किंवा प्रकाशाला लहान न होणे. तोल जाणे श्वसन अनियमित होणे. चक्कर येणे. प्रथमोपचार रुग्णाला प्रथम धीर द्यावा. रुग्णाला आडवे ठेवावे, शक्‍यतो कुशीवर ठेवावे म्हणजे श्वसन सोपे जाते. तात्पुरत्या मेंदू आघाताचा रुग्ण असेल (म्हणजे काही मिनिटे परिणाम टिकून परत नीट झाले असल्यास) ऍस्पिरिनची गोळी द्यावी, यामुळे रक्तप्रवाह पातळ होऊन मेंदूमध्ये रक्त सर्वत्र पोचते. यामुळे पुढील धोका टळतो. घरी करायची शुश्रूषा अर्धांगवायूच्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर पुष्कळ काळजी घ्यावी लागते. असा रुग्ण दीर्घकाळ सांभाळावा लागतो. त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली नसते. अचानक आलेला अर्धांगवायूसारखा गंभीर आघात, अंथरुणाला खिळून राहावे लागणे, म्हातारपण, परावलंबित्व ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो.

या रुग्णांना खालील समस्या भेडसावतात
दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी येणाऱ्या अडचणी – यात जेवण, लघवी, मलविसर्जन, झोप, हालचाल करण्याची गरज या सर्व बाबी येतात. अंथरुणात पडून राहण्यामुळे पाठ, कंबर, ढुंगण यावर जखमा होतात. या टाळण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. यात वारंवार कूस बदलणे, शेक देणे, मऊ-हवेशीर अंथरुण, दबाव-बिंदूकडे लक्ष देणे या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत. पडून राहिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे न्युमोनिया व इतर आजार लवकर होतात. स्नायू दुर्बल होतात. यासाठी व्यायामोपचार करावे लागतात. बरे व्हायला अनेक आठवडे-महिने जातात. काही जण यानंतरही बरे होत नाहीत.

मेंदूजल विकार (हैड्रोकेफॅलस)
मेंदूजल मेंदू व मज्जारज्जूभोवतीच्या विशिष्ट पोकळ्यांत एक द्रवपदार्थ (मेंदूजल) भरलेला असतो. या द्रवपदार्थात काही क्षार, साखर, प्राणवायू, इत्यादी पोषक पदार्थाचे ठरावीक प्रमाण असते. मेंदू व मज्जारज्जूच्या आतील भागांना या पदार्थाचा पुरवठा होण्यासाठी या द्रवाचा उपयोग असतो. आजूबाजूचे रक्तवाहिन्यांचे जाळे व हे मेंदूजल यांमध्ये पदार्थाची सतत देवाणघेवाण चालू असते. मेंदूचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही व्यवस्था आवश्‍यक असते. काही आजारांत पाठीच्या कण्यातून तपासणीसाठी पाणी काढून घेतात ते हेच मेंदूजल असते. मेंदूजलविकार काही जन्मजात दोषांमुळे मेंदूजलाचे प्रमाण व त्याचा दाब वाढतो. अशा बाळाचे डोके मोठे दिसते. टाळूही मोठी व फुगलेली आढळते. जन्मलेल्या काही बाळांमध्ये पाठीच्या कण्यावर कोठेही पातळ त्वचा असलेला (किंवा त्वचा नसलेला) फुगा दिसतो. हा देखील मेंदूजलाचा फुगा असतो. सौम्य प्रमाणात असतील तर हे दोन्ही विकार शस्त्रक्रियेने बरे होण्यासारखे असतात. आता सोनोग्राफी तंत्राने या दोन्ही विकारांचे गर्भावस्थेतच निदानही करता येते.

आयुर्वेद व योगोपचार
रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे रक्तपुरवठ्यात अडथळा येऊन मेंदूत बिघाड होतो. अशा आजाराला रक्तचंदन चूर्ण व जेष्ठमध चूर्ण समभाग एकत्र मिसळलेले तीन ते सहा ग्रॅम (एक-दोन चमचे) रोज याप्रमाणे एक दोन महिने घ्यावे. यामुळे रक्तप्रवाह नियमित राहण्यास मदत होते पण अर्थातच प्रारंभिक तीव्र अवस्थेत तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्‍यक आहे. रुग्ण रुग्णालयातून घरी आल्यानंतरच वरील उपचार करावेत. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना आधी रुग्णालयात दाखल करावे लागते. घरी आणल्यानंतर नस्य, बस्ती, अभ्यंग, वाफाऱ्याचे शेक, आसने व काही औषधे यांच्या मदतीने सुधारणा होऊ शकते. एकदा आजाराची पहिली तीव्रता ओसरली, मलमूत्र विसर्जनाची पूर्वसूचना देणे शक्‍य झाले, की खाटेवर पडल्यापडल्या पवनमुक्तासन करावयास मदत करावी. प्रेम आणि सहानुभूतीने रुग्णास धीर द्यावा.
या बरोबरच महायोगराज गुग्गुळ एक ग्रॅम गोळी तीन वेळा आणि एकांगवीर 500 मि.ग्रॅ. गोळी तीन वेळा ही औषधे सुधारणा होईपर्यंत पोटातून द्यावीत. हळूहळू इतर आसने शिकवता येतील. शक्‍याशक्‍यता पाहून वज्रासन, पद्मासन, भुजंगासन, इत्यादी शिकवता येईल. काही रुग्णांना आसने करताना अवयवांच्या कडकपणामुळे वेदना जाणवते. अशा रुग्णांचे श्वसन तपासावे. फक्त डावी नाकपुडी मोकळी आहे, उजवी बंद अशी स्थिती असल्यास डाव्या नाकपुडीत सुगंधी कापसाचा बोळा ठेऊन ती बंद करावी. या उपायाने उजवी नाकपुडी मोकळी होते. एकदा उजव्या बाजूने श्वसन सुरू झाले, की 15 मिनिटे बोळा तसाच ठेवून, नंतर काही तास बोळा काढावा व नंतर परत बसवून अर्धा तास जाऊ द्यावा. याप्रमाणे हळूहळू दोन्ही नाकपुडयांतून श्वसन एकसारखे चालू होईल अशी काळजी घ्यावी. यामुळे अवयवांचा कडकपणा कमी होतो. याउलट अवयवांना अगदी शिथिलपणा असेल तर उजवी नाकपुडीच चालू असण्याचा संभव असतो. या परिस्थितीत डावी नाकपुडी चालू करण्याचा प्रयत्न करावा. आसने करताना एकदम योग्य आसन व्हावे अशी इच्छा अवास्तव आहे. हळूहळू प्रगती होत जाते. हे सर्व करायला खूप सहनशीलता आणि चिकाटी लागते. हे उपचार यौगिक परंपरेनुसार सांगितले आहेत. आपण स्वतःही या क्षणी कोणत्या नाकपुडीने आपला श्वास चालू आहे हे तपासू शकतो. सर्वसाधारणपणे कोणती तरी एकच नाकपुडी चालू असते हे अनुभवास येईल. दिवस-रात्र, आजारपण, इत्यादींप्रमाणे विशिष्ट बाजूने श्वसन चालू राहते असा अनुभव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)