मॅच्युरिटीची फसवी व्याख्या

लोकांना माणसं भेटत नाहीत, ती फिरत नाहीत, कामाच्या ठिकाणी वेगळे काही अनुभव येत नाहीत असे नसते. कामासाठी देखील अनेक जण अनेक ठिकाणी प्रवास करतात. दैनंदिन आयुष्यात काय काय सुरू असते. पण त्यावर फारसे न बोलणे, सिलेक्‍टिव्ह बोलणे, गॉसिप करता येईल अशा वर्तुळात खडे मारून बघणे, ह्यालाच मॅच्युरिटी समजले जाते. स्वतःबद्दल लिहिणे कसे फालतू असते आणि हातात नसलेल्या, आपले काहीही कर्तृत्व, योगदान नसलेल्या जगाबद्दल थोर चर्चा करत सुटणे कसे ग्रेट असते, ही एक वेगळी मॅच्युअर शाखा असते. सगळ्यांत सुरक्षित चर्चा. आपल्याला कोणी आपल्या कर्तृत्वासाठी मोजणार नाही, पण आपण सर्वांचे न्यायाधीश!

व्यक्त होता येत नाही, म्हणून काही शेअर न होणे वेगळे आणि हे बोलले तर हा हे अर्थ लावेल आणि ते केले तर ते पाच-पन्नास हजाराचे काम माझ्याकडून जाईल अशी गणितं सतत मांडून जगावे लागणे वेगळे. आपली इतकी बोटचेपी झालेली असतांना मोकळे बोलणाऱ्या कोणालाही त्याने कसे चुकीचे केले अमुक प्रसंगात, फेसबुकवर, व्हॉट्‌स अॅपवर काय लिहायचे आपले आयुष्य हा आपलं झाकून, दुसऱ्याचे वाकून फंडा तर आणखीनच थोर असतो.

कितीतरी वेगवेगळ्या फिल्ड्‌समधली माणसे असतात जगात. वेगवेगळ्या परिस्थितीला ते सामोरे जात असतात. कामाच्या ठिकाणच्या आणि एकूणच आयुष्यातल्या गमती जमती, अनुभव शेअर करतांना त्यांचे जणू हात शिवलेत, तोंड बंद करून बुक्क्‌यांचा मार देईल कोणी अशा थाटात ते जगतात. कुठे जा ये वाढवली की चार गोष्टी आपल्या फायद्याच्या घडतील आणि कुठे कोणाला छान-छान केले की आपले भविष्य, इच्छा सुरक्षित होतील, ह्याला लोक मोठे होणे म्हणतात. असले काहीच छक्के पंजे खेळावे न लागणारे लोक आजकाल फार दुर्मिळ आहेत. ताज्या, दमदार मनाने जगणे अनुभवणारे. पूर्वग्रहाने गोष्टी न तोलणारे आणि मनातले मनमोकळे बोलून टाकणारे. आपण शरीराची थोडीफार काळजी घेतो. पण मनाच्या देखरेखीकडे भरपूर दुर्लक्ष करतो. त्यातून समाजमान्य ठोकताळ्यांना डोक्‍यावर ओझ्यासारखे ठेवून जगत असतो. ते जोखड खाली उतरवले, तरच मनातले व्यक्त करता येते. जितके मनमोकळे होत जाऊ, तितके मनाचे गुंतेही अलगद सुटत जातात. मॅच्युरिटीच्या फसव्या कल्पनांना दूर करून मनमुराद जगता येते.

…आणि माणूसघाणेपणाचा शिक्का
अमुक तमुक कसा माणूसघाणा आहे, हे बोलायला आपल्याला फार आवडत असते. माणसांचे वाईट अनुभव आल्यानेच कोणाचा माणूसघाणेपणा वाढत जातो, असे म्हणणे फारच धाडसाचे आहे! अपवाद असतील. पण असे सरसकटीकरण करणे योग्य नसते, ते आपण समजून घेतले पाहिजे. स्वतःलाच काही प्रश्‍न विचारले पाहिजेत. आपल्याला नेमके कोणाला माणूसघाणे म्हणावेसे वाटतेय, ते तसा शिक्का समोरच्यावर मारण्यापूर्वी आपल्याला विचारावे. तेंव्हा कळते, आपली व्याख्याच स्पष्ट नसते. आपल्या सोयीने आणि आपल्या आकलनाने आपण चटकन हे लेबल कोणालाही चिटकवतो. कधी आपलाच काही सुप्त स्वार्थ, गणित त्या मागे असते.

दुसरी गोष्ट अशी की आपल्याला इतरांबद्दल असे कितीसे माहित असते? त्यामुळे, अमुक व्यक्ती माणूसघाणी आहे किंवा कसे हे आपलेच त्या व्यक्तीविषयीचे म्हणणे असते. आपल्याला असे का वाटतेय, हा आपल्या आतला शोध झाला. ही माणूसघाणी मंडळी माणसांपेक्षा कुत्र्या-मांजरींवर प्रेम करतात एकवेळ, पण माणसांचा द्वेष करतात, अशीही पुस्ती जोडायला आपल्याला आवडत असते. तिची दुसरी बाजू आपण लक्षात घेत नाही. मूक पशु पशुपक्ष्यांना आणि झाडाझुडूपांना देखील समजून घेऊ शकणारी माणसे उलट मानवी भावभावना अधिक संवेदनशीलतेने समजून घेऊ शकतात. सामान्यीकरण करायचेच तर ते असेही करता येते.

कायमच लोकांमध्ये वावरणाऱ्या, सतत अनेकांच्या भेटीगाठीची ओढ लागलेल्या माणसांना माणूसप्रेमी/माणूसप्रिय म्हणायचे की स्वत: मध्ये पुरेसे रमता न आल्याने ते सारखे कोणाच्या भेटीसाठी आसुसलेले असतात, असे म्हणायचे, असाही विचार करून बघता येतो. मुळात, माणसेच नकोत अजिबात अशी टोकाची माणसे फारच क्वचित असावीत. अगदी व्यक्ती केन्द्री असलेले (आपल्याला वाटणारे) लोक सुद्धा. माणसे सिलेक्‍टिव्ह असतात, असेच जास्त ठामपणे म्हणता येते! मग ती माणूसप्रिय असोत किंवा कोणी. तथाकथित माणूसप्रिय माणसे तरी सर्वांशी मैत्री करतात का? सर्वांना घरात आणून एकसारखी वागणूक देऊ शकतात का? ते ही निवडक लोकांनाच जास्त जवळ करत असतात. त्याचीही काही स्वार्थी कारणे असूच शकतात. म्हणूनच हा माणूसघाणेपणाचा शिक्का जपूनच वापरावा!

– प्राची पाठक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)