मृत्यू ‘सांगून’ येऊ शकतो ?

यमराजाचे दूत कधीच सांगून येत नाहीत, यावर संपूर्ण जगाचा विश्‍वास आहे. मृत्यू अटळ आहेच; मात्र तो “सांगून’ आल्यास किती बरे होईल, असा विचार अनेकांच्या मनात येऊन गेलेला असतोच. मृत्यूची भविष्यवाणी शक्‍य असल्याचे काही संशोधक मानतात. अमेरिकेत काही संशोधकांनी माश्‍यांवर प्रयोग करून त्या आधारे त्यांनी स्वतःच्या मृत्यूची तारीखही वर्तविली. संशोधकांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, ज्याला ‘मृत्यूचा टप्पा’ मानणे शक्‍य आहे. इंग्रजीत त्याला ‘डेथ स्पायरल’ असे म्हणतात.

पंचवीस वर्षांपूर्वी जीवनाचे दोनच टप्पे मानले जात होते. जन्मापासून प्रौढपणापर्यंतचा पहिला टप्पा, तर दुसरा टप्पा प्रौढपणाचा. या टप्प्यात प्रत्येक जीव आपल्यासारखे जीव जन्माला घालतो. या दोन्ही टप्प्यांमध्ये नैसर्गिकरीत्या मृत्यूची शक्‍यता फारच कमी असते. त्यानंतर जसजसे दिवस निघून जाऊ लागतात, तसतसे आपण मृत्यूकडे वेगाने प्रवास करू लागतो. वार्धक्‍यात हा वेग आणखी वाढतो. जीवनात “लेट लाइफ’ हाही एक टप्पा असतो आणि त्या टप्प्यात मृत्यूची शक्‍यता वाढते, असे नव्वदीच्या दशकात शास्त्रज्ञ मानू लागले.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील लॉरेन्स म्यूलर आणि मायकेल रोज या दोन संशोधकांनी माश्‍यांवर संशोधन करून असे प्रतिपादन केले की, या “लेट लाइफ’च्या टप्प्यात माणसाच्या मृत्यूचे अनुमान करणे शक्‍य असते. त्यांनी 2800 माश्‍यांना दोन नर माश्‍यांसमवेत एका जारमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांना दुसऱ्या नरांसोबत ठेवण्यात येत असे आणि दररोज त्या माश्‍यांनी किती अंडी दिली याची मोजदाद केली जात असे. माश्‍या मरेपर्यंत अंड्यांची मोजदाद केली जात असे. माश्‍यांचे सरासरी आयुष्य काही आठवड्यांचे असते.

दररोज माश्‍यांना या जारमधून त्या जारमध्ये घालणे आणि त्यांची अंडी मोजणे हे अवघड काम होते. परंतु काही विद्यार्थ्यांच्या मदतीने म्यूलर आणि रोज यांनी हे अवघड काम पूर्ण केले.
या प्रयोगात एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, मृत्यूच्या काही दिवस आधी मादी माश्‍या अंडी देणे बंद करतात. म्हणजेच आपल्यासारखेच जीव जन्माला घालण्याची त्यांची कुवत संपुष्टात येते. अंडी देणे बंद केल्यास ती माशी मृत्यूच्या जवळ पोचली आहे, हे स्पष्ट होते. एखाद्या माशीचे वय 60 दिवसांचे असो किंवा 15 दिवसांचे, तिने अंडी देणे बंद केले म्हणजेच ती मृत्यूच्या दारात पोचली, असे मानता येते, हे त्यांच्या लक्षात आले.

अंडी देणे बंद केल्यापासून मृत्यूपर्यंतच्या कालावधीला शास्त्रज्ञांनी “डेथ स्पायरल’ असे नाव दिले. हीच गोष्ट नर माश्‍यांमध्येही दिसून आली. मुले जन्माला घालण्याच्या त्यांच्या क्षमतेत मृत्यूपूर्वीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून आले. माद्यांनी दिलेल्या अंड्यांच्या संख्येमध्ये झालेली घसरण आणि नर माश्‍यांच्या मादीसोबत रत होण्याच्या क्षमतेत झालेली घट यावरून त्यांच्या मृत्यूचा दिवस निश्‍चित करता येतो, असा दावा करण्यात आला. माश्‍यांच्या मृत्यूचा शास्त्रज्ञांनी केलेला अंदाज 80 टक्के माश्‍यांच्या बाबतीत बरोबर निघाला.

असा प्रयोग करणाऱ्यांमध्ये म्यूरल आणि रोज हे दोघेच नाहीत, तर इतरही काही शास्त्रज्ञांनी असे प्रयोग केले आहेत. अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील जेम्स कर्टसिंगर हे असेच एक शास्त्रज्ञ होत. त्यांनीही माश्‍यांवरच प्रयोग केले आणि माश्‍यांच्या मृत्यूच्या तारखेचा त्यांच्या प्रजननक्षमतेशी संबंध आहेच, असे त्यांनीही ठासून सांगितले. एखादी तरुण माशीही अंडी देणे बंद करीत असेल, तर तिचाही अकाली मृत्यू होणार हे निश्‍चित आहे, असे त्यांना दिसून आले. अर्थात, हाच फॉर्म्युला माणसांच्या बाबतीत लागू करता येईल, याबाबत मात्र त्यांचे दुमत आहे. मृत्यूच्या आधीच्या जीवनाचा टप्पा “डेथ स्पायरल’ म्हणून ओळखला जाण्याऐवजी “रिटायर्मेन्ट’ म्हणून ओळखला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

“रिटायर्मेन्ट’चा हा कालावधी माश्‍यांच्या बाबतीत स्पष्टपणे ओळखता येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, ज्या दिवशी माशी एकही अंडे देणार नाही, त्या दिवशी हा कालावधी सुरू होतो. कारण माश्‍या हे अंडी देणारे यंत्र आहे, असे कर्टसिंगर मानतात. काही आठवड्यांच्या आपल्या आयुष्यात माश्‍या तब्बल 1200 अंडी देतात. या पार्श्‍वभूमीवर, एखाद्या दिवशी माशीने एकही अंडे दिले नाही, तर मामला वेगळा आहे, हे लगेच ओळखता येते. अर्थात, मुले जन्माला घालण्याची क्षमता आणि मृत्यू यांच्यात नेमका काय संबंध आहे, या प्रश्‍नाचे उत्तर शास्त्रज्ञांकडे अद्याप नाही.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेम्स कॅरे यांच्याकडे मात्र या प्रश्‍नाचे उत्तर असावे. ते म्हणतात, मुलांना जन्म दिल्यानंतर अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढते आणि त्यामुळे मादीची प्रकृती नाजूक बनते. ज्याप्रमाणे महिलांना आई झाल्यावर दातांचा त्रास सुरू होतो आणि काही मुले जन्माला घातल्यानंतर हा त्रास आजाराचे स्वरूप धारण करतो, तसेच हे आहे. दहा वर्षांपूर्वी जेम्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी वृद्ध झालेल्या काही उंदरांच्या माद्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. त्यांची गर्भाशये काढून तरुण माद्यांच्या गर्भाशयांचे त्यांच्यावर प्रत्यारोपण केले. त्यामुळे वृद्ध माद्यांची तब्येत चांगली झाली आणि त्यांचे आयुष्यही वाढले.

कर्टसिंगर यांनी माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये याबाबतीत साधर्म्य असते हे मानण्यास नकार दिला असला तरी म्यूलर आणि त्यांचे सहकारी असे मानतात की माणूससुद्धा इतर प्राण्यांप्रमाणे “डेथ स्पायरल’ या अवस्थेतून जातोच. त्या काळात त्याच्या मृत्यूचा अंदाज काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण वृद्धापकाळात अनेक दुखणी मागे लागलेली असतात. स्मरणशक्तीही कमजोर झालेली असते. संकटांचा मुकाबला करण्याची शक्तीही या वयात घटलेली असते. डेन्मार्कमध्ये याविषयी नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे. त्यात असे दिसून आले की मृत्यूपूर्वी माणूस मानसिकदृष्ट्या कमकुवत बनतो.

माश्‍यांवर केलेल्या प्रयोगाच्या आधारावर माणसाच्या मृत्यूच्या दिवसाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, तर “डेथ स्पायरल’मध्ये होणारे अनेक त्रास कमी करता येऊ शकतील. मृत्यू तर अटळ आहेच; परंतु त्यापूर्वी होणारा त्रास, यातना कमी करणे शक्‍य आहे. असे झाल्यास मृत्यू इतका यातनामय राहणार नाही आणि त्याची भीतीही कमी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
114 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
15 :blush:
2 :cry:
5 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले आपल्या धर्मशास्त्रात सन्तशास्त्रद्याने ह्याचे अचूक अनुमान केलेले आहे त्यांच्यामते जन्म व मरण हा भेद आत्म्याला नसतोच त्याला शरीर बदलणे असे म्हंटले आहे जसे आपण आंघोळ केल्यावर कपडे बदलतो आता खर्या अर्थाने जर आधुनिक शास्त्रानुसार हा आत्मा कोणते शरीर धारण करतो ह्याचा शोध घेणे जरुरीचे आहे आपल्या संतशास्त्राज्ञानी ह्यासाठी ८४लक्ष योनी असल्याचे सांगितले आहे व प्रत्येक कर्माला एक योनी सांगितली आहे त्या नुसार आत्मा ते शरीर धारण करतो पूर्वीच्या काळी मुर्त्यू झाल्यावर त्याला शेणानी सारवलेल्या जमिनीवर ठेवण्यात येत असे त्या शेणाने सारवलेल्या जागेवर ज्या खुणा उमटत असत त्यावरून त्या आत्म्याने ती विशिष्ठ जीवयोनी स्वीकारल्याचे समाजात असत मृत्यू जरी सांगून येत नसला तरी मृत्य येण्याची निश्चित तारीख वेळ आगाऊ समजण्याचे शास्त्र आपल्या धर्मात अंगितले आहे ह्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे प्रत्येक आत्म्याला जन्म घेतेवेळी त्याची आगाऊ पूर्ण जशी जाणीव असते तशी मृत्यूची सुद्धा जाणीव असते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)