मृत्यू झाल्यावर बंदीला रुग्णालयात नेणार का?

न्यायालयाने कारागृह प्रशासनाला विचारला प्रश्‍न

पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या महेश राऊत याने कारागृह पोलिसांनी तीन आठवड्यापासून तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे नेले नसल्याची तक्रार गुरुवारी न्यायालयात केली. त्यामुळे बंदीला काय मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का? असा सवाल न्यायालयाने केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेष न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित शोमा सेन यांच्या जामिनावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. त्यावर उद्या (शुक्रवार, दि. 2 नोव्हेंबर) रोजी, तर गडलिंग यांच्या जामिनावर 14 नोव्हेंबरला निर्णय होणार आहे.

या प्रकरणातील आरोपी शोमा सेन आणि अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. त्यावेळी राऊत यालाही न्यायालयात आणण्यात आणले होते. तो म्हणाला, “मला अनेक दिवसांपासून पोटात तीव्र वेदना होत आहेत. त्यावर दर सोमवारी तज्ज्ञ डॉक्‍टरांना भेटून उपचार घ्यावे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. आजारामुळे मला सतत उलट्या आणि रक्तस्राव होत आहे. असे असूनही तीन आठवडे संबंधित डॉक्‍टरांकडे नेण्यात आले नाही.’

त्यावर कारागृह पोलिसांनी स्पष्ट केले की, “राऊत याला ससूनला नेण्यासाठी एस्कॉट उपलब्ध होत नाही. एस्कॉट येईपर्यंत संबंधित डॉक्‍टरांची वेळ संपते, त्यामुळे ते घरी जातात. पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर न्यायालयाने मात्र नाराजी व्यक्त करीत बंदीला काय मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का? असा सवाल केला. तसेच कारागृह प्रशासनाने स्वत:चे एस्कॉट घेवून त्याला त्वरीत रुग्णालयात न्यावे,’ असे आदेश दिले.

अॅड. गडलिंग यांनी रंगीत पेन्सिल, रुमाल, पुस्तके, फोल्डर, बेडशीट, डिक्‍शनरी आणि न्यायालयाचे काही निकाल मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्यावर “सुरक्षेच्या कारणास्तव बेडशीट देता येणार नाही, पण आणखी दोन ब्लॅंकेट पुरवू, डिक्‍शनरी आणि पुस्तके तपासून देवू, फोल्डर देण्यास काही हरकत नाही, छोटे रुमाल पुरविण्यात येतील. तसेच त्यांच्याकडे असलेले हाफ स्वेटर घेवून फुल स्वेटर देण्यात येईल,’ असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

नागपुरात बोचरी, तर पुण्यात गुलाबी थंडी
अॅड. गडलिंग यांना पुरसे कपडे देण्यात आले असल्याचे कारागृह पोलिसांना सांगितले. मात्र, तरीही “मला थंडी वाजत असून दोन दिवसांपूर्वी थंडीचा झटका आला होता. मला धूळ आणि थंडीची अॅलर्जी आहे,’ असे अॅड. गडलिंग यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याचे आदेश देत न्यायाधीश म्हणाले, “नागपूरएवढी थंडी पुण्यात नाही. नागपुरात बोचरी तर पुण्यात गुलाबी थंडी आहे.’

पेन्सिल मिळाली, पण शार्पनर नाही
“कारागृहात चित्र काढण्यासाठी रंगीत पेन्सिल देण्यात याव्यात,’ अशी मागणी गडलिंग यांनी केली आहे. त्यावर “पेन्सिल देता येतील, पण त्याला धार लावण्यासाठी शार्पनर देता येणार नाही. त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता आहे,’ असे पोलिसांनी स्पष्ट केले. “प्रशासनाने शार्पनर स्वत:जवळ ठेवावे, मला गरज असेल तेव्हा ते मागू,’ असे गडलिंग म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)