मृताच्या वारसांना 60 हजारांची मदत

  • तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप

घोडेगाव – केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 या वयोगटातील स्त्री अथवा पुरूष मृत झाल्यास एकरकमी 20 हजार रूपयांची मदत वारसांना देण्यात येते. अशी व्यक्‍ती मृत झाल्यास त्याच्या वारसांनी संबंधित गावचे कामगार तलाठी अथवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आंबेगाव तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केले. मृताच्या तीन वारसांना यावेळी मदत देण्यात आली. त्यावेळी सबनीस बोलत होते.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार विजय केंगले, फिरोज जमादार, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, धोंडमाळ-शिंदेवाडी उपसरपंच संजय शिंदे व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य, लाभार्थी उपस्थित होते. तालुक्‍यातील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील वर्षा ज्ञानेश्‍वर गाढवे, विशाल कैलास काळे (दोघेही रा. घोडेगाव) व सखुबाई मारूती भांडाकर (रा. धामणी) या तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये या प्रमाणे 60 हजार रूपयांचे धनादेश देण्यात आले. यामध्ये श्रावणबाळ योजनेतील 8 लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील 5 लाभार्थी तर संजय गांधी योजनेतील 26 लाभार्थ्यांपैकी 25 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर 1 लाभार्थ्यांचे प्रकरण नामंजूर करण्यात आले, अशी एकूण 38 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर केली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमधून दारिद्य्र रेषेखालील नागरिकांचा नैसर्गीक मृत्यू, अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना योजनेचा लाभ दिला जातो. तर आम आदमी योजनेंतर्गत खेड्यातील भूमिहीन शेतकरी, 1 हेक्‍टर बागायती अथवा 2 हेक्‍टर कोरडवाहू भुधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील 9 ते 12 वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना दरमहा 100 रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते, असे नायब तहसीलदार केंगले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)