मूळव्याधीविषयी जाणून घेऊ…

त्यांचे वय 50 वर्षाच्या आसपास असेल. सकाळी उठल्यापासून पती, मुलगा, सून, नातवंडे यांच्यासाठी स्वयंपाकापासून बाकीच्या घरातील कामांमध्ये त्या सतत गुंतलेल्या असत. काही दिवस त्यांचे कामात लक्ष लागत नव्हते. वारंवार झोपून राहणे आणि बराच वेळ स्वच्छतागृहात घालवणे हे त्यांच्या बदललेल्या वागण्याचा अर्थ कुटुंबातील कोणालाच कळत नव्हता. त्यासुद्धा काहीच सांगायला तैय्यार नव्हत्या. अखेर जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या सुनेला खोलीत बोलावून घेतले आणि त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल कल्पना दिली. पोटाशी संबंधित काहीतरी आजार असेल अशा गैरसमजुतीतून त्यांना नेहमीच्या डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले मात्र औषधांमुळे त्रास काही थांबेना. अखेर चारचौघांकडे चौकशी केल्यानंतर चांगल्या शल्यचिकित्सकाकडे जाऊन त्यांनी तपासणी करून घेतली व त्यांना मूळव्याधीचा (पाईल्स) त्रास असल्याचे निष्पन्न झाले व त्यानंतर उपचार करवून घेतले.

या प्रसंगातील “त्या’ म्हणजे आपल्यापैकी कोणाच्याही घरातील स्त्री, पुरुष अथवा मुलगा, मुलगी असू शकते. बदललेल्या जीवनशैली आणि आहारामुळे मूळव्याधाची समस्या घरोघरी भेडसावत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रश्‍न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा. पाईल्ससह फिशर आणि भगंदराचे आजार सार्वत्रिकपणे दिसून येतात.

मूळव्याधीचे दोन प्रकार असतात. विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) आणि रक्तस्त्रावासहित (रक्त मूळव्याध). गुदद्वाराच्या सभोवताली आतील बाजूस असलेल्या रक्तवाहिन्या बाहेर आल्यामुळे तेथे सातत्याने तीव्र वेदना होतात व काटा टोचल्यासारखे वाटते.

परिकर्तिका (फिशर) यामध्ये गुदभागी भेगा पडतात व त्यामुळे तीव्र वेदना होतात. तीव्र वेदनांसह आग होणे आणि मलाबरोबर रक्त बाहेर पडते. तर भगंदरामध्ये (फिस्टुला) गुदाच्या जवळ जखम होते. बाहेरून बरी झाली तरी ही जखम आतल्या बाजूपर्यंत वाढत जाते. जखमेतून रक्त किंवा पू येण्याच्या तक्रारी असतात.

पारंपरिक उपचार पद्धतीनुसार होणाऱ्या शस्त्रक्रिया अतिशय वेदनादायी असत आणि त्यानंतर रुग्णाला बरे होण्यास खूप वेळ लागत असत. परंतु सध्याच्या वेगवान आयुष्यात कामाच्या ताणामुळे कमी वेळेत बरे करणाऱ्या उपचारांकडे रुग्णांचा कल दिसून येतो. अशा जलद उपचारांमध्ये अग्रगण्य असलेल्या लेसर तंत्राच्या उपचाराचा समावेश होतो. लेसर हेमरॉईडप्लास्टी ही हिलिंग हॅंड्‌समध्ये अवलंबली जाणारी अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती वेदनारहित असून कमीतकमी छेद घेऊन काही तासांतच रुग्णाला आराम मिळवून देणारी वैशिष्टयपूर्ण पद्धत आहे.

मलविसर्जनाच्या वेळेस रक्तस्त्राव झाल्यामुळे लोक घाबरून जातात. मलमार्गात (रेक्‍टल) होणाऱ्या रक्तस्त्रावावर उपचार उपलब्ध आहेत.
मूळव्याधीच्या प्राथमिक टप्प्यात जेव्हा रुग्णांना मलविसर्जनाच्या वेळी होणारा रक्तस्त्राव आणि वेदना रोखता येत नाहीत तेव्हा हे दोन्ही उपचार तंत्र प्रभावी ठरतात. त्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:

  • शस्त्रक्रियेदरम्यान छेद घेतला जात नाही त्यामुळे टाके घालण्याची गरज नाही.
  • शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास कमीतकमी, लवकर बरे होण्यास मदत होते.
  • शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्ण घरी जातो व एक-दोन दिवसात कामावर रुजू होऊ शकतो.
  • शस्त्रक्रियेदरम्यान चिमट्यासारख्या बाह्य वस्तूंचा वापर नाही.
    संबंधित भागापुरती भूल देऊन किंवा कमी वेळ भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते.
  • मूळव्याध असो की फिशर, भगंदर किंवा अन्य कोणताही आजार, त्याचे निदान व उपचार लवकरात लवकर व तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून झाले तर आनंददायी जीवन जगण्याची संधी प्रत्येकालाच मिळू शकते.

त्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने यासंबंधीचे गैरसमज मनातून काढून टाकून सर्वांना आरोग्य साक्षर करण्याची. या कामात तुमचा आमचा सर्वांचाच हातभार लागला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)