मूल्याधारित शिक्षण आवश्‍यक : मुख्यमंत्री

 

पुणे  – अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहे. तो दूर करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण आवश्‍यक आहे. विश्‍वशांती विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण प्राप्त केलेली नवी पिढीच जग बदलेल, असा विश्वास मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोथरुड येथील एमआयटी कॉलेज प्रांगणात शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, स्वीडनचे ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक मायकल नोबेल, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण विजय भाटकर, यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. अरुण निगवेकर, न्यूट्रॉन इलेक्‍ट्रॉन सिस्टिमचे चेअरमन नानीक रुपानी, अध्यात्मिक गुरू जे. पी. वासवानी, प्रसिध्द तबलावादक पंडित सुरेश तळवळकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मूल्यरहित शिक्षण ही फक्त माहिती असते; ते ज्ञान नसते. जीवन जगताना कोणत्याही विषयाचे केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते, तर त्याला मूल्य शिक्षणाची जोड आवश्‍यक आहे. विश्‍वशांती विद्यापीठाचे स्वप्न बघून ते पूर्ण करणाऱ्या कराड कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे. मूल्याधारित शिक्षणामुळे जगात बंधुत्वाची भावना निर्माण होईल. यामुळे जग अधिक सुंदर होईल, ते सर्वांना जगण्यास लायक होईल. यापुढेही एमआयटी नवीन प्रयोग करण्यात आघाडीवर राहील, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

जीवन जगण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आवश्‍यक आहे. मूल्याधारित शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडतील.

डॉ. भटकर म्हणाले, या विश्‍वशांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. अशा विद्यापीठाची निर्मिती व्हावी, असे माझे स्वप्न होते. डॉ. कराड यांनी ते पूर्ण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन उंचावेल.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माची जोडच जगाला शांततेचा रस्ता दाखवेल. स्वामी विवेकानंदाच्या विचारावर ही संस्था सुरु आहे. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळेल. यावेळी दादा वासवानी, मायकेल नोबेल, डॉ. जय गोरे यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्व शांती विद्यापीठाचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विश्व शांती विद्यापीठाची शपथ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कराड यांनी केले. तर आभार मंगेश कराड यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)