मुसळधार पावसाने मराठवाडा, विदर्भाला धुतले

नद्यांना पूर : कशीबशी जगलेली पिकेही पाण्याखाली

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.21- जोरदार पुनरागमन करणाऱ्या पावसाने राज्याच्या संपूर्ण भागांत हजेरी लावली आहे. यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात नद्यांना पूर आले आहेत, तर पिके पाण्याखाली गेली आहेत. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची संततधार सुरू असून अनेक धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. साताऱ्यातील कोयना, धोम, कण्हेर, बलकवडी व उरमोडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सांगलीतील कसबे डिग्रज -मौजे डिग्रज बंधारा दुसऱ्यादा पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे. नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने, भंडारदारा, निळवंडे धरण भरले आहे. जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी पावसाची रिपरिप सुरू होती. वीर धरणातूनही पाणी सोडल्याने ते कर्नाटक हद्दीत जात आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात संततधार सुरू आहे, तर काही जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे ओढे, नाले भरून वाहिले. पुरामध्ये पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोजेगाव शिवारात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे पिकामध्ये पाणी साचले

विदर्भात मोठे नुकसान
अमरावतीमध्ये सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच भंडारा जिल्ह्यात 24 तास पडणाऱ्या पावसामुळे नाले भरून वाहू लागले आहेत. भंडारा तालुक्‍यात जवाहरनगर कोढी गावातील 15 घरे बुडाली आहेत. या पंधरा कुटुंबांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.

पावसाचा जोर ओसरणार

पावसाचा जोर बुधवारपासून कमी होण्याची शक्‍यता आहे. कोकण आणि गोवा वगळता राज्यातील उर्वरित भागात येत्या चोवीस तासांत हलक्‍या सरी कोसळतील. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात गेले काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये चक्रवात निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गुजरात, कोकणात अनेक िंठकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्‍या सरी होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)