जकार्ता: आशियाई स्पर्धांमध्ये उत्तर कोरियाच्या दोन प्रशिक्षकांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध हरकत घेत निषेध नोंदवल्याची घटना घडल्यानंतर आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने खेळाच्या संस्कृतीत आणि नियमांत बदल करण्याची गरज व्यक्‍त केली आहे. असे न घडल्यास ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेतून मुष्टियुद्ध हा खेळ बाहेर फेकला जाण्याची शक्‍यताही या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

जकार्ता आशियाई स्पर्धेतील घटनांची पुनरावृत्ती चार वर्षांपूर्वी दक्षिण कोरिया येथील आशियाई स्पर्धेदरम्यान झाली होती. त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याने खेळाची प्रतिमा डागाळली होती. तर एका खेळाडूने कांस्यपदक नाकारल्यामुळे त्याला एक वर्षासाठी बंदीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये निकालनिश्‍चितीच्या आरोपावरून तब्बल 36 पंच व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्यास खेळाच्या भविष्याच्या दृष्टीने हे घातक ठरेल, असा इशारा देण्यात आला आहे.

रिओ ऑलिम्पिक आणि इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेतील घटनांमुळे मुष्टियुद्ध या खेळाची प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे नियमांमध्ये बदल करण्यासाठीच्या प्रक्रियेवर सध्या काम सुरू असून लवकरच नवी नियमावली सादर होऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाचे कार्यकारी संचालक टॉम व्हर्गेट्‌स यांनी सांगितले. मात्र, ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेच्या तोंडावर नवी नियमावली लागू करणे कितपत योग्य आहे याचे उत्तर त्यांनी दिले नाही. मुष्टियुद्ध हा ऑलिम्पिकमधील मूळ सहा क्रीडाप्रकारांपैकी एक असून ऑलिम्पिकमधील स्थान टिकविण्यासाठी आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

त्यातच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने जागतिक मुष्टियुद्ध महासंघाला इशारा देताना सांगितले आहे की, आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान टिकवायचे असेल तर मुष्टियुद्धामध्ये सुसंस्कृतपणा आणावा लागेल. अन्यथा आगामी ऑलिम्पिकमधून हा खेळ वगळण्यात येईल. ऑलिम्पिक संघटनेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर मुष्टियुद्ध संघटनेने नियमांत बदल करायला सुरुवात केली आहे. मात्र स्पर्धेच्या तोंडावर नवीन नियमावली लागू केल्यास त्याचा परिणाम स्पर्धकांच्या कामगिरीवर होण्याची शक्‍यता असल्याने त्यावरही वाद उद्‌भवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)