मुळा-मुठेत जलवाहतूक शक्‍य आहे का?

संग्रहित छायाचित्र

जलमार्ग प्राधिकरणाने मागविला पालिकेचा अहवाल

पुणे – गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या बेसुमार जलप्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीचे आस्तित्त्व संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे महापालिकेकडून तब्बल हजार कोटी रुपये खर्चून मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्प आणि तब्बल 6 हजार कोटींचा नदीकाठ विकसन प्रकल्प राबविला जात आहे. या दोन्ही प्रकल्प होत असतानाच; दुसऱ्या बाजूला या नद्यांतून वाहतूक प्रकल्पही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेमध्ये मुळा आणि मुठा या नद्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर आता पुढील टप्प्यात या दोन्ही नद्यांमध्ये वाहतूक प्रकल्प राबविता येणे शक्‍य आहे का, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाने महापालिकेला केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अभिप्रायावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

देशांतर्गत जलवाहतुकीला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार देशातील शंभराहून अधिक नद्यांमध्ये वाहतूक केली जाणार आहे. शहराच्या मध्यभागातून मुळा-मुठा नद्या वाहतात. जलवाहतूक योजनेत या नद्यांचा समावेश करण्यासाठी खासदार अनिल शिरोळे पाठपुरावा करत आहे. यासंबधीची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यावर राज्य शासनाने मुळा-मुठा नद्यांचा जलवाहतूक योजनेत समावेश करण्यासंबधीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री यांच्याकडे पाठवला होता.

त्यानुसार आता येत्या पावसाळी अधिवेशनात नॅशनल वॉटरवेस बिल -2015 च्या मूळ प्रस्तावात बदल करून मुळा-मुठा नद्यांच्या नावाचा समावेश करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे जलवाहतूक योजनेत मुळा-मुठेचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

सुट्टीवरून परतताच आयुक्‍त देणार उत्तर
केंद्र सरकारच्या भारतीय अन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने महापालिका आयुक्तांना 13 एप्रिल रोजी पत्र पाठविले आहे. त्यात मुळा-मुठा नद्यांमध्ये जलवाहतुक करणे शक्‍य आहे का, याची तपासणी करावी, त्यासंबधीचा अहवाल आणि महापालिकेची बाजू पाठवावी, अशी सूचना केली आहे. मात्र, त्या पत्रानंतर तत्कालिन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची बदली आणि त्यानंतर आयुक्तपदी नियुक्त झालेले सौरभ राव हे सुट्टीवर असल्याने प्रशासनाकडून तुर्तास या पत्राबाबत काहीच हालचाल झालेली नाही. दरम्यान, आयुक्त परत येताच त्यांच्याशी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेची सल्लागाराला विचारणा
यापूर्वी मुळा-मुठा नदीत जलवाहतूक करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून चाचपणी सुरू होती. त्यावेळी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने खासगी कंपनीच्या माध्यमातून एक प्रस्ताव तयार करण्यात होता. त्याविरोधात काही स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेस न्यायालयात खेचले होते. त्यामुळे महापालिकेने हे पत्र नदीकाठ विकसन प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागारास पाठविले आहे. त्यानुसार, फिजिबिलिटी रिर्पोट करून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)