मुळा-मुठा नदी प्रदूषित ; 73 प्रकारचे मासे नामशेष

डिझॉव्हल्ड ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी


घाणीमुळे चिलापी वाढली

थेऊर- मुळा-मुठा नदीच्या पाण्यात वाढत्या प्रदुषणामुळे ऑक्‍सिजनच शिल्लक नसल्याने या नदीतून सुमारे 73 प्रकारचे मासे नामशेष झाले आहेत. जलचरांना जिवंत राहण्यासाठी पाण्यात डिझॉव्हल्ड ऑक्‍सिजनचे (डीओ) प्रमाण प्रतीलिटर दोन मिलीग्रॅमपेक्षा कमी असणे गरजेचे असते. परंतू, मुळा-मुठा नदीचे पाण्यात बहुतांशी ठिकाणी याचे प्रमाण अधिक असल्याने प्रदूषणांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे उघड होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे पाण्याच्या सर्वाधिक प्रदूषणाचे संकेत देणारे चिलापी जातीचे मासे नदीपात्रात मोठ्या प्रमाणांत आढळून येत असल्याने मुळा मुठेची प्रदुषण पातळी वाढल्याचे उघड होत आहे.

पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदीतील मलजल आणि सांडपाणी यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजवा कालव्यात पाणी सोडल्याचा दावा केला असला तरी आजही नदीतील पाण्यावर रसायनयुक्त दुषित पाण्याच्या फेसाचा थर दिसत आहे. यामुळे हवेली आणि दौंड तालुक्‍यातील पाण्याचे स्रोत तसेच पाणवठे प्रदुषित झाले आहेत. शेतीसाठी वरदान ठरलेली ही योजना आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या मुळावर उठली आहे. मुळा-मुठा नदीची प्रदूषणातून सध्या तरी मुक्ती होणार नसल्याचे सध्याची स्थिती आहे.

खडकवासला धरणांतून पावसाळ्यात अतिरिक्त झालेले पाणी वगळता एक थेंब देखील पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. नेमक्‍या याच स्थितीचा फायदा घेऊन वर्षातील सुमारे आठ महिने सांडपाणी, मलजल आणि कारखान्यातून बाहेर पडणारे, तसेच मानवी जीवितास घातक ठरणारे रसायनयुक्त पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका त्यावर कुठलीही प्रक्रीया न करता जसेच्या तसे नदी पात्रात सोडते. याचबरोबर हजारो टन कचराही येथेच टाकला जातो. परिणामी, हे पाणी दौंड, बारामती आणि उजनीचे पाणी थेट सोलापूरपर्यंत जात असल्याने नदीतीरावरील रहिवासी आणि सोलापूरच्या नागरिकांना सक्तीने रसायनयुक्त दूषित पाणी प्यावे लागते. याबरोबरच शेतीला देखील दूषित पाणी मिळत असल्याने अन्नधान्याच्या उत्पादनावरही त्याचा परीणाम होत आहे.

पुणे शहराला जादा पाण्याची आवश्‍यकता होती, त्यावेळी पाणी घेतल्यानंतर तयार झालेल्या सांडपाण्या प्रक्रिया करून ते जुन्या कालव्याद्वारे शेतीस पुरवावे, अशी अट घालण्यात आली होती. 1997 मध्ये हा करार झाल्याने गरजे एवढे पाणी उचलले गेले; परंतु, मुंढवा येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कालव्यात सोडण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु, नदीतील पाण्यावर येत असलेला फेस पाहता पाण्यावर प्रक्रिया करणे पुणे महानगर पालिकेस पुर्णतः शक्‍य झाले नसल्याचे उघड आहे.

“जायका’बरोबर एक हजार कोटीचा करार…
मुळा मुठा नदीतील पाणी सध्या प्रदूषित असले तरी गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पानंतर शासनाने पुण्यातील मुळा आणि मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीशी (जायका) तब्बल एक हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जायकाच्या अधिकाऱ्यांनी करारावर सह्या केल्या असून जानेवारी 2022 मध्ये हा शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होणार आहे. पुण्यातून वाहणारी ही नदी मोठ्या प्रमाणात दूषित असून या नदीचे शुद्धीकरण व्हावे, अशी मागणी बऱ्याच काळापासून पुणेकरांकडून करण्यात येत आहे. अखेर केंद्र सरकारने याबाबत जपानी कंपनीशी करार केला असून त्याबाबत अद्याप तरी कुठली कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

पाच वर्षे वाट पहा…
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील 302 प्रदूषित नद्यांची यादी तयार केली होती, त्यामध्ये मुळा-मुठा नदीचाही समावेश आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) जपानी कंपनीशी करार झाला. या शुद्धीकरणासाठी जायका कंपनीने दिलेले 1 हजार कोटींचे कर्ज फेडण्यासाठी 40 वर्षांची मुदत मिळाली असून या करारांतर्गत 11 नवीन मल-जल शोधन यंत्र निर्माण केले जाणार आहे. या नदीच्या शुद्धीकरणावर एकूण 990.26 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात केंद्र सरकारचा वाटा 841.72 कोटी तर पुणे महानगरपालिकेचा वाटा 148.54 कोटी इतका असेल. अनेक वर्षापासून मुळा-मुठा आपले पूर्ववैभव प्राप्त करून खळाळून केव्हा वाहते, हे पाहणाऱ्यांसाठी जानेवारी 2022 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)