मुळा पाटबंधारे कर्मचाऱ्यांचे तहसीलदारांना “निषेध निवेदन’

राहुरी विद्यापीठ – एका कर्मचाऱ्याला धमकी दिल्याच्या कारणातून मुळा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना या घटनेच्या निषेधाचे निवेदन नुकतेच दिले. संबंधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, मुळा पाटबंधारे उपविभागाच्या शाखा 1 मधील मोजणीदार या पदावरील कर्मचारी नारायण पोपट तमनर यांना चारी व पाटपाण्याच्या कारणावरून अर्जुन जगन्नाथ पानसंबळ (रा. सडे, ता. राहुरी) यांनी “तुझी माझ्याशी गाठ आहे. तुझ्यावर महिलेची खोटी विनयभंगाची केस करतो,’ अशी धमकी दिली. त्यामुळे तमनर यांना सरकारी काम करताना अडथळा निर्माण होत आहे व क्षेत्रावर मारहाणीची भीती वाटत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्‍तीवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदरच्या घटनेचा मुळा पाटबंधारे उपविभाग, राहुरीच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सह्या करून निषेधाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार जी. एस. तळेकर यांना देण्यात आले. निवेदनावर मुळा पाटबंधारे विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता पी. पी. तनपुरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. राज्य शासकीय कर्मचारी संघ, नगर व राज्य प्राथमिक शिक्षक भारती, नगर यांनीही निषेधाचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)