“मुळा’च्या आवर्तनासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी

नेवासा – मागील वेळी उन्हाळी आवर्तनात कुकाणा परिसरात शेतकरी व मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांत झालेला राडा लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या आवर्तनासाठी पोलीस बंदोबस्त मागण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात त्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यातच घोडेगाव येथे कालव्याच्या भरावाला तडे गेल्याने कमी दाबाने पाणी सोडले जात आहे.

कुकाणा येथे आवर्तनातून भरणे काढण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. शेतकऱ्यांनी कालवे फोडल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले होते. त्यामुळे कुकाणा, गेवराई या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात टेलचा भाग असलेल्या गावांमध्ये पोलिसांची कुमक बोलवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टेलच्या भागात पाणी पोहोचविणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कठीण जात आहे. पाण्याअभावी येथील खरीप पिके संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेतकरी जमावाने पाणी घेत असल्याने अधिकाऱ्यांना विरोध करणे अशक्‍य झाले आहे. मुळा धरणाच्या इतिहासात पावसाळी आवर्तनात प्रथमच पोलीस बंदोबस्त घेण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.

मागील उन्हाळी आवर्तनात पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याने मुळा पाटबंधारे विभागाच्या घोडेगाव व चिलेखनवाडी येथील कार्यालयांना आग लावून पेटवून देण्याचा प्रकार घडला होता. त्याचाच धसका वरिष्ठ अभियंते व उपअभियंत्यांनी घेतला आहे. पोलीस बंदोबस्तात का होईना मात्र टेलच्या शेतकऱ्यांचे भरणे काढले जातील का? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. टेल-टू-हेड पाणी मिळण्याचा नियम असताना अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अमरापूर विभागांतर्गत येणाऱ्या भातकुडगाव टेल डीवायवरील शेतकऱ्यांना कायमच पाण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागते. मात्र, प्रतीक्षा करूनदेखील अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात. या चारीकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मुळा उजवा कालव्याला घोडेगाव परिसरात मातीचा भराव असल्याने आवर्तन सुटल्यानंतर येथील माती पाण्याने फुगते. त्यामुळे या भरावातून पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे.

नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज दिला आहे. पावसाने मोठी उघडीप दिल्याने आवर्तनात जादा पाणी खर्च होत आहे. अधिकाऱ्यांची तारांबळ उडू नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)