मुळाच्या आवर्तनातून शेवगाव तालुक्‍यातील गावे वंचित

प्रातिनिधिक छायाचित्र

नगर, दि. 18 (प्रतिनिधी)- मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून 20 एप्रिल रोजी शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मुळा पाणी वाटप कायद्यानुसार टेल टू हेड पाणी वाटपाचे नियोजन असताना उजव्या कालव्यावरील वितरिका क्र. 2 व 3 डी.वाय. पैकी वितरिका 2 डी. वाय.ला अद्यापि पाणी मिळालेले नाही. त्यामुळे या वितरिकेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेवगाव तालुक्‍यातील अनेक गावांमधील उन्हाळी पिके जळाली आहेत. राजकीय दबावापोटी डी.वाय. 2 ला पाणी सोडले गेले नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी जळालेल्या पिकांसह नगरला मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांच्या दालनात घेराव आंदोलन केले. केवळ राजकारणापोटी टेल टू हेडचा नियम डावलला जात असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी या भागातील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, उत्तमराव आहेर, शिवाजी दिवटे, सुधाकर चोथे, रामदास डोंगरे, कैलास मुटकुळे, संतराम कोळगे, अशोक दिवटे, भगवान दिवटे, विष्णू मुटकुळे, अरुण मुटकुळे, वसंत खैरे, दिलीप पंडित, आदींनी कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली. यावेळी मोरे यांच्या टेबलवर पाण्याअभावी जळालेल्या भुईमूग, घास, मका, फळ, आदी पिकांचा नमुना ठेवण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळा लाभक्षेत्राच्या उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक 2 मध्ये वडुले, आव्हाणे, दिंडेवाडी, ढोरजळगाव, बऱ्हाणपूर, मळेगाव, गळणवाडी, सामणगाव, आदी गावांना पाणी मिळते. “मुळा’चे आवर्तन सुरू होवून महिना होत आला आहे. पाटबंधारे विभागाने वितरिका क्र.1 ला पाणी सोडले आहे. परंतु, डी.वाय. 2 ला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. वेळेत पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांची पिके जळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणीवाटप कायद्यानुसार टेल टू हेड पाणी वाटप करणे आवश्‍यक होते. परंतु, मुळा पाटबंधारे विभागाने डी.वाय. 2 ला पाणी न सोडता थेट हेडला पाणी सुरू केले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्यासाठी तातडीने डी.वाय. 2 ला पाणी सोडावे अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसानीस संपूर्णपणे मुळा पाटबंधारे विभागाला जबाबदार धरून नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे संजय कोळगे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)