“मुळा’चे पाणी शेवगावच्या गावांना मिळालेच नाही

कार्यकारी अभियंत्याचा गलथान कारभार : पाण्याअभावी जळालेल्या उसाचे पंचनामे करा
शेवगाव – पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या गलथान कारभारामुळे शेवगाव तालुक्‍यातील टेलच्या भागातील पिकांना मुळा धरणाचे हक्काचे पाटपाणी मिळाले नाही.त्यामुळे जळालेल्या उसाच्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या या नुकसानीस जबाबदार असलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कालवा सल्लागार समितीचे सदस्य शिवाजी भिसे यांनी केली आहे.
भिसे यांनी जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन यांना पाठविलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील मुळा धरणाच्या टेलच्या शेतकऱ्यांनी विविध ठिकाणांहून कर्ज घेऊन उसाची पिके घेतले आहे. परंतु, पाटपाण्याअभावी ती पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून शेतक-यांना पाणी मिळत नसल्याने उत्पन्नाअभावी कर्जफेड कशी करायची हा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. कार्यकारी अभियंत्यांनी “टेल टू हेड’ असा पाटपाणी आवर्तनाचा नियम गुंडाळून वरच्या भागातील विहीरी, शेततळे भरुन देण्यासाठी पाण्याची उधळपट्टी केली.
त्यामुळे टेलच्या मळेगाव, सामनगाव, आव्हाणे, वडूले, फलकेवाडी, अमरापूर या भागातील शेती उद्‌ध्वस्त झाली आहे. याबातची तक्रार आपण संबंधीत अभियंत्यांकडे दोन वेळा केलेली आहे. मात्र याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही.
मळेगाव येथील ग्रामसभेने ही पाथर्डी शाखा कालवा वितरिका क्रमांक 2 वर असलेल्या 300 हून अधिक अनधिकृत पाइपलाईन काढून टाकाव्यात, या मागणीचे निवेदनही संबंधित अभियंत्यास देण्यात आले होते. या पाईपलाईनमुळे वितरीकेच्या क्षमते एवढ्या पाण्याचा अगोदरच सर्रास उपसा होवून पुढील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. मात्र तरीही मोठया आर्थिक तडजोडीमुळे या पाईप लाईन काढण्यास टाळाटाळ केली जात आहे. असा आरोप भिसे यांनी निवेदनात केला आहे.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही देण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)