मुळशी पॅटर्न चित्रपट “शो’मध्ये पोलीस साध्या वेशात

सिंहगड आणि कोथरूडमध्येही पोलीस बंदोबस्त

पुणे – मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शीत झाला. मुळशी तालूक्‍यातील गुन्हेगारी, चित्रपटातील गाण्यात गुन्हेगारांचा सहभाग आणि चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे यांना धक्‍काबुक्‍की आणि कार्यालयाची झालेली तोडफोड यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटावर झालेल्या आरोपांमुळे, त्यात दाखवलेल्या काही खऱ्या प्रसंगामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता पोलिसांना वाटत होती. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी शहरातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सिंहगड आणि कोथरूड परिसरातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

-Ads-

मुळशी पॅटर्न हा चित्रपट मुळशी परिसरातील गुन्हेगारीवर आधारीत आहे. यामध्ये तेथील काही गुन्हेगारांनीही “आरारारा’ या गाण्यात भूमिका निभावल्या आहेत. या चित्रपटातील काही दृश्‍यांवर काहींनी आक्षेपही नोंदवला होता, तशी तक्रारही पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. तर न्यायालयाच्या आवाराबाहेर एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी आलेल्या एका मुळशीतील टोळक्‍यासही गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दिग्दर्शन प्रविण तरडे यांना झालेल्या मारहाणीनंतर मुळशी, कोथरूड, सिंहगड परिसरातील काही गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय होण्याची भिती पोलिसांना वाटत होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. यामुळे चित्रपटाचा शुक्रवारी प्रदर्शनही पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. शहरात हा चित्रपट ज्या-ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, त्या प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक “शो’ला साध्या वेशातील पोलीस बसवण्यात आले होते.

मुळशी पॅटर्न चित्रपटात प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृहांमध्ये साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सिंहगड व कोथरूड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. चित्रपट बघून आल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रीया चांगल्या दिसत होत्या. यामुळे कायदा-सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही असे दिसत आहे.
– अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)