धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 44 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ
पिरंगुट -महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मुळशी तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये एकूण 44 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 36.92 टन कचरा गोळा करण्यात आला. पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दत्तात्रेय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने मुळशी तालुक्यातील पौड येथील मुख्य चौक गावठाण, अंतर्गत रस्ते गटारे, तहसील कचेरी, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय तसेच पंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पिरंगुट गावातील अंतर्गत रस्ते गटारे ग्रामपंचायत कार्यालय परिसर, कॅम्प परिसर ते घोटवडे फाटा, पिरंगुट कॅम्प ते लवळे फाटा तसेच भुगाव चिंतामणी राईस मिल ते बावधन गावच्या हद्दलगतच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आले. यापूर्वीही प्रतिष्ठानच्या वतीने राज्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शासकीय दाखले वाटप, तरुणांना रोजगार मार्गदर्शन, उद्योग मार्गदर्शन, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबीर तसेच आरोग्य शिबीरे आदी उपक्रमांचा समावेश आहे.