पिरंगुट – खडतर मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही, असे उद्‌गार मुळशीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी महाराष्ट्राची युवा धावपटू संपदा बुचडे हिने काढले. तसेच संपदाने आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजी बुचडे आणि प्रशिक्षकांना दिले. मारुंजी गावची रहिवासी असलेल्या संपदाने क्रीडाक्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांनी आयोजित केलेल्या कराटे व तायक्‍वांदो स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुळशी तालुका क्रीडाशिक्षक संघाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेल्या संपदाने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच 32व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तिने भारतीय महिला धावपटूंच्या गटात विजेतेपद पटकावले होते. जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा सुतार, तालुका क्रीडाशिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत भुमकर, सचिव संदीप पवार व सहसचिव संतोष बनकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन संपदाला गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)