मुळशीत पर्यटनासाठी सुरक्षा योजना हवी

आणखी किती बळी जायची वाट पाहायची 


प्रशासनाचे डोळे उघडण्याची गरज

हिंजवडी- समर कॅम्प या गोंडस नावाच्या ऍक्‍टिव्हिटीने मुळशीत तीन विद्यार्थ्यांचा नाहक बळी घेतला आहे. तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या समर कॅम्पच्या बेजबाबदारपणाने असंख्य पालकांचे डोळे उघडले असतील तरीही प्रशासनाचेही डोळेही यानिमित्ताने उघडण्याची गरज मुळशी तालुक्‍यात निर्माण झाली आहे.

मुळशी तालुक्‍यात निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण पहायला मिळते. मात्र निसर्गाच्या कवेत जाताना निसर्गाच्या नियमांची पायमल्ली करत सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने, निष्काळजीपणाने वागल्याने पर्यटकांना जीव गमवावा लागण्याच्या अनेक घटना मुळशी तालुक्‍यात घडल्या आहेत. धरणं, तलाव, नदी, दऱ्या यामध्ये पर्यटकांनी व काही स्थानिकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आता तत्पर कठोर पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

समर कॅम्प आयोजक संस्था गोलमाल
चेन्नईस्थित ईसीआय मॅट्रीक्‍युलेशन स्कूलमधील 20 विद्यार्थी मुळशी तालुक्‍यातील कातरखडक येथे समर कॅम्पसाठी आले आणि पहिल्याच दिवशी यातील 3 मुलांना आयोजकांच्या निष्काळजीपणाने जीव गमवण्याची दुर्दैवी घटना घडली. तर आयोजक असलेली जॅकलीन स्कूल ऑफ थॉट ही संस्था एक गोलमालच आहे. या संस्थेचे ना कोणते रजिस्ट्रेशन ना कोणती परवानगी आहे.

एवढेच नाही तर या संस्थेला कोणताही अनुभव नसावा किंवा अशी कोणती संस्था अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे. कारण कोणत्याही प्रकारचा अशा संस्थेचे गुगल, फेसबुक अशा कोणत्याही सोशल मिडीयावर छोटेशे नामोनिषाणही अस्तित्वात नाही. त्यामुळे संस्था म्हणजे गोलमाल अर्थात बनाव वाटत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा समर कॅम्पशी शाळेचा संबंध नव्हता. ही एक खाजगी ट्रीप होती.

मग अशा बनाव असलेल्या संस्थेच्या हवाली पालकांनी मुले सोपवली कशी? हाही प्रश्न आहे. तर सोबत येणारे शिक्षक हे इतके बेजबाबदारपणे का वागले? हाही संशोधनाचा विषय आहे. हा संस्थाचालक स्थानिक व्यक्ति असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, मात्र कोणत्याही आरोपीचे नाव पत्रकारांना सांगायचे नाही, असा आदेश पोलीस अधिक्षकांकडून आल्याने नाव सांगता येणार नसल्याचे पौड पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले.

मुळशीत याआधीही नाहक बळी
महिन्यापुर्वीच मुळशीतल्याच पिरंगुट गावचा रहिवासी असलेल्या सुमित केदारी या 12 वर्षीय मुलाचा मुळा नदीत अंबडवेट-भरे हद्दीत बुडून मृत्यू झाला होता. चटका लावणारी ही घटना घडली तेव्हा घटना कोणाच्याही लक्षात आली नव्हती.

साधारण 5-6 वर्षांपुर्वी भरे आयटीआयचा एक विद्यार्थी मुळा नदीत भरे-मुलखेड हद्दीत ऐन उन्हाळ्यात बुडून मृत्यू पावला होता. कारण मुळशीच्या टाटा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले होते व प्रशासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याच सूचना त्यावेळेस देण्यात आल्या नव्हत्या.
हाडशी येथील बंधाऱ्यात अनेकवेळा बुडून मृत्यू झालेत.

ताम्हिणी येथील दरीतही मागच्या वर्षी 2 तरूण वाहून गेले होते.
लवासा येथेही अनेकदा असेच अपघात घडतात. त्यामुळे पर्यटनाने नटलेल्या मुळशीत आता सुरक्षा योजना राबवणे गरजेचे आहे.

 या पर्यटन केंद्रावर हव्यात सुरक्षा योजना
तालुक्‍याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव तलावापाशी जीव सुरक्षारक्षक असावा
कुठुनही घुसण्यास मज्जाव असावा
लवासा येथीही तलावांमध्ये योग्य प्रतिबंध असावा

मारणेवाडी, उरावडे बंधारा, अंबडवेट बंधारा, मुळा नदीचे काठ, मुळशी धरण, कोळवण येथील काशिग गावचा तलाव, ताम्हीणी येथील दऱ्या, तलाव बंधारे या सर्व ठिकाणी सुरक्षा उपाययोजना दर्शवणारे फलक, जीव सुरक्षा रक्षक असावेत

यांसह एखादी स्थानिक तरूणांची प्रशासनाने रेस्क्‍यु टीम तयार करावी
या सर्व ठिकाणांची पाहणी करून असणाऱ्या खोलींविषयी माहितीचे फलक प्रत्येक काठावर उभारावेत, ज्यामुळे पर्यटकांना संभाव्य धोक्‍यांचा अंदाज येऊ शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)