मुळशीत पर्यटकांचीच दमछाक !

वाहतूक कोंडीमुळे पोलीस प्रशासन हतबल : कर्णकर्कश गीतांचा सिलसिला

प्रभात वृत्तसेवा

पुणे – मागील तीन दिवसांपासून शहरासह घाटमाथ्यावर वरूणराजा जोरदार बरसत आहे. त्यातच रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे सकाळीच पर्यटकांनी कुटुंबासह व मित्र-मंडळीबरोबर मुळशीकडे आपला मोर्चा फिरवला. मात्र, पुणे शहरासह अन्य भागातून मुळशी, ताम्हीणी घाट, पवना, लवासा याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे पर्यटन ट्रॅफीकमध्येच झाले. त्यामुळे अनेक पर्यटकांच्या आनंदावर ट्रॅफीकने पाणी फिरले आहे. चांदणी चौकापासूनच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तरी पर्यटकांनी मुळशीतील धबधबे पाहण्यासाठी आणि पावसात भिजत गरमागरम भजी खाण्याचा आनंद घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

यंदा वरूणराजाने सुरवातीपासून कृपादृष्टी केल्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच डोंगरमाथ्यावरील धबधबे सुरू झाले. त्यामुळे मुळशी तालुक्‍यातील ताम्हिणी घाट, पळसे धबधबा याठिकाणी पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरवात केली. तसेच लवासा, पवना, ऍम्बी व्हॅली याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. याठिकाणी जाण्यासाठी चांदणी चौक, हिंजवडी, लोणावळा तसेच कोकणमार्गे पर्यटक येत असतात. शनिवार, रविवार आल्यावर या सर्व ठिकाणांवर तरूण-तरूणींची झुंबड उडते. सध्या आखाड पार्ट्या जोरात सुरू आहेत. त्यातच वरूणराजा जोरदार बरसत असल्यामुळे नागरिकांनी फिरायला जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार सकाळपासूनच मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी मुळशीत पर्यटकांची गर्दी होणार, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार, याची कल्पना वाहतूक पोलिसांना असल्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता.

दरम्यान, मुळशी, लवासा, ताम्हिणी घाट याठिकाणी जाणारे बहुतांश पर्यटक हे चांदणी चौकमार्गे जातात. त्यामुळे सकाळपासून या मार्गावर ठिकठिकाणे वाहतूक कोंडी झाली होती. भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा, पौड, मुळशी धरण, पळसे धबधबा आणि ताम्हिणी घाट याठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीला पर्यटकांना सामोरे जावे लागले. पर्यटनाचा अर्धा दिवस वाहतूक कोंडीत गेल्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडले. तरी पर्यटकांनी या वाहतूक कोंडीतही भिजण्याचा आणि पर्यटनाचा आनंद घेतला. यामध्ये दुचाकवरील पर्यटकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत होती. ही कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. रात्री उशीरापर्यंत या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आखाडामुळे हॉटेल आणि फार्महाऊस फुल्ल
पर्यटन आणि आखाड साजरा करणाऱ्यांमुळे मुळशी परिसरातील हॉटेलवाल्यांची चांगलीच चांदी झाली आहे. त्यातच काही पर्यटकांनी फार्महाऊस बुक करून त्याठिकाणी आखाड पार्ट्या करत पावसाचा आनंद घेतला. त्यामुळे येथील सर्व हॉटेल, फार्महाऊस फुल्ल झाले होते. रात्री उशीरापर्यंत या मार्गावरील फार्महाऊस व हॉटेलमध्ये पार्ट्या सुरू होत्या. दिवसभर पावसात व धबधब्याखाली भिजत गरमागरम कांदाभजी, बटाटाभजी आणि वडापाव खाणाऱ्या शौकिनांनी टपऱ्यांवर गर्दी केली होती.

तरूणांच्या हुल्लडबाजीमुळे कोंडीत आणखीन भर
वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ही कोंडी सोडवण्यात येत होती. मात्र, बराच वेळ एकाच ठिकाणी थांबयला लागत असल्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या तरूण-तरूणी वैतागले होते. अशा परिस्थितीत काही तरूण आहे, त्याचठिकाणी कारमधील मोठ मोठ्याने गाणी लावून नाचत होती. रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने पार्किंग केल्यामुळे कोंडीत आणखीन भर पडत होती. त्यातच दुचाकीवरून आलेले तरूण मोठ्याने ओरड मधूनच गाडी चालवत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता.

पळसे धबधबा याठिकाणी वाहनांची लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यातच एक कार बंद पडल्यामुळे डोकेदुखी झाली होती. मात्र, आमची दुचाकी असल्यामुळे आम्ही बाजूने कलटी मारली. त्यावेळी अनेक तरूण कोंडी झालेल्या ठिकाणी कारमधील गाणी मोठ-मोठ्याने वाजवून नाचत होते. मात्र, अनेक ठिकाणी झालेल्या कोंडीमुळे गाडी चालवायचा कंटाळा आला होता.
– ओम मांजरे (पर्यटक)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)