मुळशीतील 77 जणांवर तडीपारीची कारवाई

– सण, उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केली कारवाई
पौडमधील 5, कोळवणमधील 57, खुबवलीतून 10, तर मुठ्यातून 5 जणांचा समावेश
– वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पाठविला होता प्रस्ताव
पिरंगुट – मुळशी तालुक्‍यातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी 77 जणांना मुळशी मावळच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मुळशीतून तडीपार केले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी तडीपारीची ही कारवाई आहे. तर तालुक्‍यात कोळवणमधील सर्वाधिक 60 जण मुळशीतून तडीपार झाले आहेत. पौड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता.
गणेशोत्सवाच्या काळात तालुक्‍यात ठिकठिकाणी गटातटात वादविवाद होवून त्याचे पर्यवसन भांडणात होत होते. यापूर्वी सार्वजनिक उत्सवाच्या काळात टोळीयुद्धाचा भडकाही उडालेला होता. त्यामुळे मागील 5 वर्षातील गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या घटनांचा विचार करून भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी 77 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मुळशीतून तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय अधिकारी गणपतराव माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, नारायण मोरे, हनुमंत गजे यांनी मुळशी मावळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने मंजूरी दिली. त्यामुळे 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत 77 जण मुळशीतून हद्दपार झाले आहेत. यापूर्वी कोळवणमधील 3 जणांना एक वर्षाकरीता मुळशीतून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या या कारवाईत पौडमधील 5, कोळवणमधील 57, खुबवलीतून 10, तर मुठ्यातून 5 जण तडीपार झाले आहेत. यापूर्वी एक वर्षासाठी कोळवणमधून तिघेजण तडीपार केले आहेत.
याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले की, मुळशीतील तडीपारीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. गणेशोत्सव सर्वसामान्यांना धार्मिकरित्या आनंदाने सण साजरा करता यावा, यासाठी मागील घटनांचा विचार करता ही कारवाई केली आहे. तथापि गणेशोत्सवाच्या काळात कोणी खोडसाळपणा, दमदाटीपणा केल्यास त्यांच्यावरही कारवाई करून हद्दपार केले जाईल. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची माहिती जनतेने पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)