मुळशीच्या तरुणाने फडकाविला एव्हरेस्टवर तिरंगा

पिरंगुट-प्रचंड इच्छाशक्ती, अपार शारिरीक कष्ट व स्वत:वरील आत्मविश्‍वासाच्या बळावर लव्हार्डे (ता. मुळशी) येथील 35 वर्षीय भगवान भिकोबा चवले यांनी जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. गुरुवारी (दि. 17) सकाळी 8.50च्या सुमारास त्यांनी यशस्वी चढाई करीत एव्हरेस्टवर तिरंगा फडकाविला. त्यांच्या या कामगिरीमुळे मुळशी तालुक्‍याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
भगवान चावले हे गेल्या चार वर्षांपासून आपली नोकरी सांभाळत एव्हरेस्टच्या चढाईसाठी सातत्याने शारिरीक परिश्रमा बरोबरच मानसिक तयारी करीत आहेत. गेल्यावर्षी ते एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेले होते. एव्हरेस्टच्या अंतिम टप्प्यात अवघे 100 मीटर अंतर राहिले वादळी वारे वाहू लागले होते. त्यामुळे फक्त 100 मीटर शिखरमाथा बाकी असताना नाईलाजास्तव त्यांना माघारी फिरावे लागले. मात्र कोणतीही हार न मानता भगवान यांनी त्याच वेळेस एव्हरेस्ट देवतेस त्याने वचन दिले की, ना थकता ना हरता पुढच्या वर्षी चढाईस येणार. गेले वर्षभर मेहनत करून यावर्षी न थकता, त्याच जोशात त्याच उत्साहात एव्हरेस्ट देवतेला दिलेले वचन पूर्ण करत त्यांनी गुरुवारी आपले स्वप्न साक्षात साकार केले.
ग्रामीण भागातील बालपण आणि महाविद्यालयीन काळात “एनसीसी’मध्ये सहभागी झाल्याने भगवानची शरीरयष्टी नेहमीच काटक व चिवट राहिली. वयाच्या 19व्या वर्षापासून निसर्गाशी जवळीक होऊन त्याचे ट्रेकींगचे वेड सुरू झाले. स्पर्धा परीक्षा देऊन “लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करणाऱ्या भगवानने गेली 15 वर्षापासून गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे.
काटक शरीर आणि प्रबळ मानसिकतेच्या जोरावर त्याने हिमालयातील शिखरं, सह्याद्रीमधील सुळके, कडे-कपाऱ्या तसेच गड-किल्ल्यांवर चढाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने हिमालयातील स्टॉक कांग्री, घोलप कांग्री, भागिरथी व आयलंड शिखर ही सुमारे वीस हजार फूट उंचीची शिखरे सर केली आहे. तर नाणेघाटातील खडापारशी, शहापूर (जि. ठाणे) येथील माहूली गडाजवळी वजीर, लोणावळ्यातील नागफणी, रायगडमधील लिंगाणा, मुळशीतील तैलबैला आणि मावळातील ढाक बहीरी या सह्याद्रीच्या डोंगररांगातील जीवघेण्या सुळक्‍यांवर चढाई केली. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये आतापर्यंत अडीचशेवेळा त्याने ट्रेकींग केले आहे.

  • 60 दिवसांची मोहिम
    एव्हरेस्ट मोहीमेसाठी भगवान यांनी 5 एप्रिलला कूच केली होती. 60 दिवसांच्या या मोहिमेत एव्हरेस्टसाठीचा त्याचा मुख्य प्रवास 5 एप्रिलला काठमांडूतून सुरू झाला होता. गेल्या चार वर्षांपासून तो या मोहीमेची तयारी करीत होता. अखेर त्यांच्या या जिद्दीला यश आले. त्यांच्या या कामगिरीमुळे मुळशी तालुक्‍याच्या नावलौकिकात भर पडली असून आणखी एक मानाचा तुरा मुळशी तालुक्‍याच्या शिरपेचात रोवला गेला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)