मुले आणि बेडूक

     संस्कार

  अरुण गोखले

राजू, संजू आणि विजू हे तिघे फिरायला बाहेर पडले. फिरता फिरता ते एका तळ्याच्या काठी आले. तळं पाण्याने भरलेले होते. सहज गंमत म्हणून संजूने एक बारीकसा खडा घेतला आणि पाण्यात भिरकावला. दगड पाण्यात पडला आणि तळ्याच्या पाण्यावर एका पाठोपाठ एक असे अनेक तरंग उठले. ते पाहून संजूला आनंद झाला. त्याने ती गोष्ट राजू आणि विजू ह्यांना दाखविली. त्यांनीही एक एक दगड पाण्यात मारला. त्याबरोबर पाण्यावर एकामागोमाग एक असे अनेक तरंग उठले. मुलांना आनंद झाला, मग काय ! नकळत तो त्यांचा एक खेळच झाला. जो तो लहान चपटे दगड घेऊन ते जोरजोराने तळ्यात फेकू लागला.

त्या तळ्यात पुष्कळ बेडूक राहात होते, मुलांनी पाण्यात मारलेले दगड जाऊन ते तळ्यातल्या बेडकांना लागत होते. त्यांना दुखापत होत होती. काही बेडूक तर रक्‍तबंबाळही होत होते. त्यांना वेदना होत होत्या. इकडे मुले मात्र आनंदाने नाचत होती, सुखावत होती. तुझा तरंग मोठा का माझा? असे म्हणून आनंदाने टाळ्या पिटीत होती. शेवटी एक बेडूक पाण्याच्यावर येऊन त्यांना म्हणाला’ बाळांनो! अरे तुम्ही आम्हाला असे दगड का मारता?’

त्यावर संजू म्हणाला’ अरे बेडूक दादा, आम्ही पाण्यात दगड मारतोय, आम्ही काही तुम्हाला दगड मारत नाही.’ तेव्हा तो बेडूक म्हणाला ‘बाळांनो, तुम्ही पाण्यात दगड मारत आहात, खेळत आहात, मजा करत आहात, आनंद घेत आहात, हे खरं. पण आम्ही पाण्यात राहतो ना? आमचं काय? तुमचा खेळ होतोय पण इकडे आमचा मात्र जीव जातोय त्याचं काय?’

बेडूक दादाचे ते बोलणे ऐकले आणि विजू मात्र विचारात पडला. आपण एका मागोमाग एक लहान मोठे दगड मारतो आहोत, खरंच त्यामुळे या बेडकांना इजा होत असणारच. तो चटकन संजू, राजूला म्हणाला ‘ गड्यांनो, हा बेडूकदादा म्हणतोय ते खरं आहे, या गरीब जीवांना आपण असा त्रास देणे योग्य नाही, आपण सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करायला हवं हेच आपल्याला मागच्या आठवड्यात शाळेत परिपाठाच्या वेळी शिकवले आहे ना? चला, आपण दुसरा एखादा खेळ खेळू या. ‘ राजू अन संजू ह्यांना तो विचार पटला, त्यांनी बेडूक दादाची क्षमा मागितली अन ते दुसरीकडे खेळायला निघून गेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)