मुली वयात येतांना ज्येष्ठ महिलांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा

नगर – मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून मुलींमध्ये वयात येताना होणारे शारीरीक बदल त्यांना समजावून सांगणे गरजेचे असते. मासिक धर्म सुरू होण्यापूर्वी व ऋतूस्नान सुरू झाल्यावर उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुलींशी ज्येष्ठ महिलांनी संवाद साधला पाहिजे. काही समस्या असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांशी सल्लामसलत केली पाहिजे. पूर्वी मासिक पाळी या विषयावर उघडपणे बोलणेही टाळले जात असे. परंतु, सध्या समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. पॅडमनसारख्या चित्रपटातून हा अतिशय महत्त्वाचा विषय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. ऋतूस्नानाच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन, पॅडचा वापर आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असल्याने त्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. विशेषत: ग्रामीण भागात हे काम प्रभावीपणे व्हायला हवे. त्यासाठी गावपातळीवरील महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील महिला सरपंच, महिला ग्रामसेवकांसाठी आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा विखे बोलत होत्या. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्या वैशाली नान्नोर, सभापती मनिषा ओव्हळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, सभापती चंद्रकला खेडकर, जि.प.सदस्य लिलाताई शिरसाट, सुनंदा भागवत आदी उपस्थित होत्या.

अध्यक्षा विखे पुढे म्हणाल्या की, पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती असल्याने वयात आलेल्या मुलींसाठी घरातच आजीबाईंचे, ज्येष्ठ महिलांचे मार्गदर्शन उपलब्ध असे. आता परिस्थिती बदलली आहे. मुली शारीरिक बदलांमुळे घाबरून जातात. अशावेळी शाळेतच त्यांच्यासाठी कार्यशाळा घेवून त्यांना धीर दिला पाहिजे. महिलांनीच महिलांच्या या आरोग्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रश्‍नात लक्ष घातले पाहिजे.
वैशाली नान्नोर म्हणाल्या की, समाजात आज स्त्री भ्रूण हत्येबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मासिक पाळीच्या समस्येबाबत जागृतीची गरज आहे. विशेषत: ग्रामीण भागात याची जास्त आवश्‍यकता आहे. 50 टक्के आरक्षणामुळे आज गावपातळीपासून जिल्हा परिषदेपर्यंत महिला लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांची संख्या वाढलेली आहे. त्यांनीच एक महिला म्हणून आपल्या महिलांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. मासिक पाळीबाबात पूर्वापार चालत आलेले समज गैरसमज, अंधश्रध्दा दूर केल्या पाहिजेत. सर्व महिलांनी एकत्र येवून प्रयतक्‍ केल्यास चांगले बदल निश्‍चित घडतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)