आमदार राम कदम यांचे बेताल वक्‍तव्य
मुंबई – तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करीन, असे म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुक्ताफळं उधळली आहेत.

घाटकोपरमध्ये काल दहीहंडी उत्सवात राम कदम बोलत होते. भाजपचे मुंबईतील हेच आमदार व प्रवक्ते राम कदम हे “बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहीम राबवितात. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून अनेकांकडून याचा निषेध होत आहे.

राम कदम म्हणाले, कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केले, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई-वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असे ते म्हणाले.

राम कदम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. आपण काय करतोय, कुणासमोर बोलताय, उत्साहाच्या भरात काय बोलतोय याचे भान सत्ताधाऱ्यांना राहिले नाही. आज महिलांची स्थिती बिकट आहे, त्या असुरक्षित आहेत. त्यात अशी वक्तव्य करुन राम कदमांना नक्की काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, या प्रकारानंतर राम कदम यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. या व्हिडीओच्या मागचा आणि पुढचा भाग ऐकला तर संदर्भ लागेल. अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करु नका, असे राम कदम म्हणाले.

आमदार म्हणजे काही राजा नाही – आव्हाड
पूर्वी म्हणायचे “टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर’ ही आज परिस्थिती राहिलेली नाही. आज लोकशाही आहे, कायद्याचे राज्य आहे. आमदार म्हणजे काही राजा नाही. इथे प्रत्येकाला समान न्याय आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. एका मुलीचा बाप म्हणून मला भिती वाटायला लागली. जर राम कदमांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागला, तर माझ्या मुलीला उचलून घेऊन जायचे. बाप म्हणून मला काळजी वाटायला लागली. हे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. अशा वक्तव्यांमुळे लोकांची हिम्मत वाढते. राम कदमांसारखा मोठा, पैसेवाला आमदार, मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार असे बोलत असेल तर नक्कीच भितीदायक आहे, असे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)