मुलीच्या जन्माने जिल्ह्यातील 120 कुटुंबांना “धनलाभ’

“माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत गवसली “धनाची पेटी’

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – मुलगी ही “धनाची पेटी’ असते. ती लक्ष्मीच्या रुपाने आपल्या घरात येते, आणि खरच आज तिच्या जन्माने जिल्ह्यातील 120 कुटुंबांना साक्षात “धनलाभ’ झाला आहे. “माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेंतर्गत हा धनलाभ झाला असून, त्यासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांतर्गत 120 कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेनुसार “माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली. मात्र, गेली अनेक वर्षे ही योजना कागदावरच होती. त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शासनाने या योजनेत अनेक बदल करून सुधारित योजना राबविण्यास सुरवात केली. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांना व्हावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्हाभर जनजागृती सुरू केली. या योजनेंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाला 50 हजार तर दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाला प्रत्येकी 25 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे महत्त्व पटवून देत नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले.

या आवाहनाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केलेल्या 6 कुटुंबांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहे. त्यामध्ये खेड तालुक्‍यातून 3 आणि वेल्हा 2 आणि भोर 1 अर्ज आला आहे. तसेच दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या 114 कुटुंबांनी अर्ज दिले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जुन्नर तालुक्‍यातून 41 अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ खेड 28, आंबेगाव 27, बारामती 2, शिरूर 2, दौंड 1, हवेली 2, मावळ 7, पुरंदर 3 आणि भोर येथून 1 अर्ज आले आहेत. त्यामध्ये दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांची संख्या अधिक असून, त्यांना माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती दीपक चाटे यांनी दिली.

गुंतवणूक केलेली रक्कम व्याजेसह मिळणार
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 120 कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते उघडून, प्रत्येक लाभार्थ्यांच्या नावाने ही गुंतवणूक (एफडी स्वरुपात) करण्यात येणार आहे. त्याबाबतचे बॅंकेकडून मिळालेले प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यानुसार मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला गुंतवणूक केलेली रक्कम व्याजेसह मिळणार आहे. त्यामुळे तिच्या उज्वल भविष्यासाठी हे पैसे महत्त्वाचे ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

……………
प्रत्येक योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेचा नेहमी प्रयत्न असतो. मुलीचा जन्मामुळेच पालकांना या लक्ष्मीचा लाभ मिळत असून, तो त्या मुलीचा पायगुण आहे. मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकते, त्यामुळे तिला संधी द्या. “माझी कन्या भाग्यश्री’ योजनेमुळे अनेक कुटुंबांना नक्कीच फायदा होईल.
विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष जिल्हा परिषद, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)