मुलींच्या गटात उत्तर मुंबई संघाला विजेतेपदाचा मान

पुणे – उत्तर मुंबई संघाने नागपूरचे आव्हान संपुष्टात आणताना येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेतील मुलींच्या गटात विजेतेपदाचा मान मिळविला. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात उत्तर मुंबई संघाने नागपूरचा 67-64 असा केवळ 3 गुणांनी पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. उत्तर मुंबई संघाच्या अंशिका कनोजियाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

उत्तर मुंबई संघाने पहिल्या सत्राअखेर 10-9 अशी आघाडी घेतली होती. परंतु नागपूरच्या मुलींनी जोरदार पुनरागमन करताना दुसऱ्या सत्राअखेर 29-22 आणि मध्यंतराला 52-42 अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व गाजविले. उत्तर मुंबई संघाने चौथ्या सत्रात झुंजार खेळकरताना निर्धारित वेळेअखेर 60-60 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना जादा वेळेत खेळविण्यात आला.

जादा वेळेत उत्तर मुंबई संघाने 67-64 अशी बाजी मारताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. उत्तर मुंबई संघाकडून सुझान पिंटोने 23, तर अंशिका कनोजियाने 21 गुणांची नोंद करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रीमा शेट्टीने 6 गुण नोंदवीत त्यांना सुरेख साथ दिली. नागपूरकडून श्रेया दांडेकरने 43 गुण नोंदवीत कडवी झुंज दिली. आभा लाडने 10, तर सिया देवधरने 6 गुण नोंदवीत तिला साथ दिली.

त्याआधी नागपूरच्या मुलींनी पहिल्या उपान्त्य सामन्यात पुण्याच्या मुलींचे आव्हान मोडून काढताना अंतिम फेरीत धडक मारली होती. तर दुसऱ्या उपान्त्य लढतीत उत्तर मुंबईच्या मुलींनी ठाण्याचा कडवा प्रतिकार संपुष्टात आणताना अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले होते.

पहिल्या उपान्त्य लढतीत नागपूरने पुण्याचा 64-54 असा पराभव केला. मध्यंतराला 43-33 अशी आघाडी असलेल्या पुण्याच्या मुलींना ही आघाडी टिकविता आली नाही. नागपूरने अखेरच्या सत्रात बाजी मारताना अंतिम फेरी गाठली. नागपूरकडून श्रेया दांडेकरने 17, तर सिद्धा देशमुखने 10 गुण नोंदवीत विजयात मोलाचा वाटा उचलला. पुण्याकडून श्रुती शेरिगरने 19, दुर्गा धर्माधिकारीने 14, तर आर्या रिसवडकरने 10 गुण नोंदवीत कडवी झुंज दिली.

दुसऱ्या उपान्त्य सामन्यात उत्तर मुंबईने ठाण्यावर 48-47 अशी रोमांचकारी मात केली. उत्तर मुंबईकडून सुझान पिंटोने 21, तनिसा मालवणकरने 10, तर प्रीती यादवने 6 गुण नोंदवीत चमकदार कामगिरी केली. पराभूत संघाकडून साक्षी कोटियनने 19, तर नेहा शाहूने 15 गुण नोंदवीत दिलेली झुंज अपुरी ठरली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार मेधा कुलकर्णी, गोविंद मुथुकुमार, निखिल लातुरकर व जयंत देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी रवी नायर, ओंकार कदम, ललित नहाटा व सचिन सायवळ हजर होते.

पुण्याच्या मुलींना तिसरा क्रमांक

पुण्याच्या मुलींना उपान्त्य फेरीत नागपूरकडून पराभव पत्करावा लागला. परंतु त्यांनी ठाण्याचा 84-74 असा पराभव करताना मुलींच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला. दुर्गा धर्माधिकारीने 23, तर श्रुती शेरिगरने 20 गुणांची नोंद करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. ईशा घारपुरेने 13 गुण नोंदवीत त्यांना साथ दिली. पराभूत संघाकडून साक्षी कोटियनने 24 गुणांची नोंद करताना एकाकी झुंज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)